पुणे जिल्हा | पुरंदरच्या पूर्व भागात वाटाणा पीक जोमात

वाघापूर, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेला वाटाणा सध्या जोमदार आला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असून देखील बहुतांश शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने वाटाण्याचे पीक घेतले आहे. यंदा वाटाण्याचे मोठे उत्पादन मिळून बाजारभावदेखील चांगला मिळेल, असा अंदाज उत्पादक शेतकर्यांनी व्यक्त केला आहे.
बाजारात ग्राहकांची पहिली पसंद असलेला आणि सर्वाधिक मागणी म्हणून पुरंदरचा वाटाणा ओळखला जातो. म्हणूनच शेतकरी किंवा व्यापार्यांनी विक्रीसाठी पुरंदरचा वाटाणा म्हटले की ग्राहक कोणत्याही किंमतीत खरेदी करण्यासाठी तयार असतात. पुरंदर तालुक्यात एकाच हंगामात दोन ते तीन महिन्यांत दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते.
तालुक्यातील पूर्व भागातील वाघापूर, राजेवाडी, आंबळे, टेकवडी, माळशिरस, पोंढे या गावात तालुक्यात एकाच हंगामात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते.
तालुक्यातील पूर्व भागात वाटाणा परिपक्व होण्यास अजून मोठा काळ बाकी आहे. मात्र, आताच बाजारात वाटाणा खरेदी करणारे व्यापारी सक्रिय झाले आहेत.खरीप हंगामात वाटाणा पिकाच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होत असते. वाटाणा हे केवळ दीड ते दोन महिन्यांत लाखोंचे उत्पन्न देणारे पीक आहे, असे आंबळे येथील प्रगतशील शेतकरी योगेश काळे यांनी सांगितले.
45 ते 50 दिवसांत तोडणीस
वाटाणा हे तरकारी प्रवर्गातील पीक प्रसिद्ध आहे. कमी पाण्यावर आणि कमी वेळेत तोडणीस पिक असून कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पिक म्हणून प्रसिद्ध आहे.
अत्यंत गोड चव, शेंगांचा विशिष्ट आकार आणि शेंगांच्या आतील दाण्यांची संख्या जास्त असल्याने पुरंदरच्या वाटाण्याला महाराष्ट्रासह देशाच्या विविध बाजारपेठेत विशेष मागणी असते. तसेच दरही चांगला मिळत असून केवळ 45 ते 50 दिवसांत तोडणीस येत असल्याने शेतकर्यांची वाटाणा पिकाला विशेष पसंती असते, असे पूर्व भागातील शेतकर्यांनी सांगितले.





