राणेंच्या वक्तव्याने शिवसेनेचा पूर्वीचा आक्रमकपणा पुन्हा परत आल्याने पक्षात चैतन्य

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यात मंगळवार आणि बुधवारी तणावाचे वातावरण होते. मात्र, या पक्षाला जुनी ताकद पुन्हा मिळाल्याने पक्षाच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
राणे यांच्या वक्तव्याचा राज्यभर निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी राज्यात अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक केली. रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. भाजपाच्या एका नगरसेवकाच्या तोंडाला काळे फासले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राणेंना प्रचार करू देणार नाही, असा निर्धारही शिवसैनिकांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्तेवर आल्यामुळे शिवसेनेने संयम बाळगला होता. पण राणे यांनी सर्व सीमा पार केल्या, असे रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वर्तणुकीतून संयमाचे उदाहरण घालून दिले होते.
विनाकारण हल्ले होत असतानाही आम्ही संयम बाळगला होता. पण राणे यांनी सभ्यपणाच्या सर्व मर्यादा सोडल्या. त्यानंतर शिवसैनिक शांत बसणे शक्यच नव्हते आणि मग, शिवसैनिक बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचा राग त्यांना जमेल तशा पद्धतीने व्यक्त केला. पक्ष आणि राज्यातील नागरिकांसाठी शिवसैनिकांचा आक्रमकपणा कायम राहील, असेही खा. राऊत म्हणाले.
राणेंच्या वक्तव्याने पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. पक्ष सत्तेत असल्यामुळे शिवसेना नेते आणि शिवसैनिक गप्प होते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही गप्प बसलो, असे स्थानिक पदाधिकारी किशोर तिवारी यांनी सांगितले. ते म्हणाले, ही वेळ भाजपाच्या बड्या नेत्यांच्या मागे लागण्याची आहे. किरकोळ नेत्यांना काळे फासण्याला मला मान्य नाही.
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना गुंडगिरी करत असल्याचा आरोप केला. सेना ही गुंडगिरी करून आपल्या भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालत असल्याचा आरोप केला. कॉंग्रेसच्या नेत्यांनी मात्र भाजपा नेतेच गुंडगिरी करत असल्याचा आरोप केला. भाजपाचे मंत्री रावसाहेब दानवे हे राहुल गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात. राणे यांचे वक्तव्य हा त्यांच्या गुंडप्रवृत्तीचे निदर्शक आहे, असे कॉंग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
शिवसेना आणि त्यांच्या पक्षप्रमुखांवर कोणी चाल करून येणार असेल तर शिवसैनिक सडेतोड उत्तर देतील. आमचा पक्ष आणि आमच्या नेतृत्वाचा कोणी अपमान केल्याशिवाय आम्ही कोणालाही लक्ष्य बनवत नाही. शिवसैनिकांच्या रागातून त्यांचे पक्ष आणि पक्षप्रमुखांवरील प्रेम आणि आदर दिसून येते, असे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले.





