‘कम्फर्ट झोनच्या बाहेर…’ ‘ॲनिमल’बाबत रणबीरने केला खुलासा

मुंबई – नुकताच रणबीर कपूरचा चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कर’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. या चित्रपटानंतर अभिनेत्याने आता त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरु केल्याचे समजते.रणबीर आता सहा महिन्यांनंतर म्हणजेच ऑगस्टमध्ये ‘ॲनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील असणार आहे.
सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या कथेपासून ते रणबीर कपूरच्या लूकपर्यंत सर्वच गोष्टी चर्चेत आहेत. नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये तो कुऱ्हाड हातात घेऊन सिगारेट ओढताना दिसत आहे.एका इंग्रजी मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने आपल्या या आगामी चित्रपटाबाबत सांगितले.
ॲनिमलची स्क्रिप्ट पहिल्यांदा ऐकली तेव्हा प्रचंड भीती वाटल्याचे यावेळी रणबीरने सांगितले. तो म्हणाला याआधी मला कथेतील कोणत्याही पात्राची इतकी भीती वाटली नव्हती.तसेच या चित्रपटाची कथा माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे. म्हणूनच मी घाबरलो होतो आणि उत्सुकही होतो असा खुलासा देखील रणबीरने यावेळी केला.
एरवी चॉकलेट बॉयची भूमिका साकारणारा रणबीर आता वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे चाहत्यांना देखील या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. अॅनिमल हा वर्ल्ड वाईड रिलीज होणार आहे, जो हिंदी सोबतच तेलुगु, तामिळ आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.





