रणबीर कपूरने केले ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाचे शूटिंग सुरु

ॲनिमलच्या यशानंतर रणबीर कपूर चर्चेत आहे. सध्या त्याच्या खात्यात तीन मोठे चित्रपट आहेत. पहिला- नितेश तिवारीचा ‘रामायण’, दुसरा- संजय लीला भन्साळीचा ‘लव्ह अँड वॉर’ आणि तिसरा- संदीप रेड्डी वंगा यांचा ‘ॲनिमल पार्क’. यावेळी त्याचं संपूर्ण लक्ष ‘रामायण’वर आहे. या चित्रपटाचे शूटिंग खूप आधीपासून सुरू झाले आहे. काही काळापूर्वी त्याचा चित्रपटातील लूक लीक झाला होता, ज्यामुळे नितेश तिवारी चांगलेच संतापले होते. मात्र, त्यानंतर सेटवर नो फोन पॉलिसी लागू करण्यात आली. रणबीर कपूरने काही भागांचे शूटिंग पूर्ण केले आहे. दरम्यान, तो एका बड्या चित्रपट निर्मात्याच्या कार्यालयाबाहेर दिसला.
रणबीर कपूरने ‘रामायण’साठी एक मोठे परिवर्तन केले आहे. मात्र, रामायणच्या शूटिंगमधून वेळ काढून तो त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची तयारीही करताना दिसत आहे. रणबीर कपूर लवकरच संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ या मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि विकी कौशल देखील दिसणार आहेत.
नुकताच रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो संजय लीला भन्साळी यांच्या मुंबई कार्यालयाबाहेर दिसला होता. या दरम्यान, त्याच्या हातात स्क्रिप्ट देखील दिसली होती. ‘लव्ह अँड वॉर’ची अधिकृत घोषणा जानेवारी 2024 मध्ये झाली होती. तसेच हा चित्रपट 2025 च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अलीकडेच रणबीर कपूर ‘लव्ह अँड वॉर’ मध्ये ग्रे कॅरेक्टर साकारणार असल्याची बातमी आली होती. ‘रामायण’चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर तो २०२४ च्या शेवटी या चित्रपटाचे शूटिंग सुरू करू शकतो. मात्र, या चित्रपटाचे काम आतापर्यंत कुठे पोहोचले आहे, याबाबत निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.





