येस बँकेच्या माजी सीईओला अखेर जामीन ; राणा कपूर ४ वर्षानंतर तुरुंगातून बाहेर

Rana Kapoor Bail । येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना अखेर जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर राणा कपूर शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कारागृहातून बाहेर आले. 4 वर्षांनंतर त्याला तुरुंगाबाहेर येऊन श्वास घेण्याची संधी मिळालीय.
याप्रकरणी झाली होती अटक
राणा कपूरला चार वर्षांपूर्वी ईडीने कर्ज संबंधित अनियमिततेप्रकरणी अटक केली होती. ED ने मार्च 2020 मध्ये कपूरला अटक केलेले प्रकरण येस बँकेने दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) ला दिलेल्या कर्जाशी संबंधित आहे. कपूर यांच्यावर डीएचएफएलला कर्ज देताना अनियमितता केल्याचा आरोप आहे. डीएचएफएलशी संबंधित कर्जाचे हे प्रकरण तेव्हाचे आहे जेव्हा राणा कपूर येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर Rana Kapoor Bail ।
ईडी व्यतिरिक्त, सीबीआय डीएचएफएलशी संबंधित कर्ज फसवणूक प्रकरणाची देखील चौकशी करत आहे. त्या संदर्भात मनी लाँड्रिंगसह विविध आरोपांवर एकूण 7 स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. सध्या ज्या प्रकरणात राणा कपूरला जामीन मिळाला आहे ते कर्ज फसवणुकीच्या बदल्यात स्वस्तात बंगला घेण्याशी संबंधित आहे. संबंधित बंगला नवी दिल्लीतील अमृता शेरगिल मार्गावर आहे. या प्रकरणी राणा कपूरला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, शुक्रवारी त्यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली.
कमी किमतीत बंगल्याचा सौदा Rana Kapoor Bail ।
सीबीआयने मार्च 2020 मध्ये राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू कपूर, अवंथा ग्रुपचे प्रवर्तक गौतम थापर, ब्लिस ॲडोब प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर संस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. कपूर यांनी येस बँकेच्या सीईओ पदाचा गैरवापर करून अमृता शेरगिल मार्गावर असलेला बंगला बाजारभावापेक्षा स्वस्तात विकत घेतल्याचा सीबीआयचा आरोप आहे. संबंधित मालमत्तेची मालकी पूर्वी अवंथा रियल्टीचे गौतम थापर यांच्याकडे होती आणि त्याची किंमत सीबीआयने 550 कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे. बंगला गहाण ठेवून येस बँकेकडून 400 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. नंतर तो बंगला Bliss Adobe कंपनीने 378 कोटी रुपयांना विकत घेतला, ज्यात राणा कपूरची पत्नी बिंदू संचालक आहेत.





