शेती व पाणी याबाबत रामराजेंचे योगदान लक्षात राहणारे

फलटण – रामराजे नाईक निंबाळकर यांचे व्यक्तिमत्व आगळेवेगळे आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. विधानपरिषदेचे सभापती म्हणून काम करताना कामकाजावर नियंत्रण ठेवणे, वादविवाद शांतचित्ताने मिटवणे, हे त्यांचे वैशिष्ट्य, खासियत. संसदीय कार्यपद्धतीच्या मर्यादा व प्रतिष्ठा सांभाळून सभागृह चालवण्यासंबंधीची खबरदारी रामराजेंनी अखंडपणे घेतली. सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास लिहिला जात आहे. त्यामध्ये रामराजेंचे योगदान स्पष्ट केले जाईल, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. शेती व पाणी समस्येवर त्यांनी घेतलेले निर्णय व त्यांचे योगदान अखंड लक्षात राहणारे आहे. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या अंजली कुलकर्णी यांनी लिहलेल्या “अजिंक्य- राजा” या कॉफीटेबल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फलटण येथे झाला. याप्रसंगी रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर, सुभाषराव शिंदे, बाळासाहेब सोळस्कर, प्रसाद चाफळकर, ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी, डॉ. मो. स.गोसावी आदींची प्रमुख उपस्थिती होती. शरद पवार म्हणाले, “रामराजे फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी. ते उत्तम क्रिकेटपटू होते.
महाविद्यालयीन काळात फर्ग्युसनशी आमची स्पर्धा असे. रामराजेंमध्ये राष्ट्रीय खेळाडू होण्याची चांगली क्षमता होती. ते वकील झाले. लॉ कॉलेजचे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून उत्तम असे कामकाज त्यांनी केले. संसदीय कार्यपद्धतीच्या मर्यादा व प्रतिष्ठा सांभाळून सभागृह चालवण्यासंबंधीची खबरदारी रामराजेंनी अखंडपणे घेतली. सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास लिहिला जात आहे. त्यामध्ये रामराजेंचे योगदान स्पष्ट केले जाईल, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही.” रामराजेंचा अमृतमहोत्सवी सत्काराचा मोठा सोहळा आपण घेणार असल्याचे खासदार शरद पवार यांनी स्पष्ट पवार म्हणाले, “फलटणला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर श्रीमंत मालोजीराजे यांचे सुद्धा योगदान आहे.’ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन विद्यावैभव प्रकाशन आणि अनुबंध कला मंडळ यांच्या विद्यमाने करण्यात आले. यावेळी बकुळ पराडकर, अरुण भोईटे, विजय नेवसे आदी उपस्थित होते.





