रामराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम

फलटण – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला रामराम करून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेले घड्याळ व त्यासोबत “कळेल ही आशा’ असे सूचक विधान व्हॉट्सअप स्टेटसद्वारे केले आहे. त्यामुळे रामराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसद्वारे विरोधकांना गर्भित इशारा दिल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर रामराजे नाईक निंबाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा फलटण तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होती. परंतु, याबाबत अधिकृत माहिती कोणीही दिली नव्हती. आ. जयकुमार गोरे यांनीही रामराजेंच्या प्रवेशाच्या चर्चेवरुन टीका केली होती. कोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात आ. महेश शिंदे यांनी रामराजे नाईक निंबाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूचक विधान केले होते. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यामध्ये विविध चर्चांना उधाण आले होते.
या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेले घड्याळ व त्यासोबतच “कळेल ही आशा’ अशा आशयाचे विधान व्हाट्सअप स्टेटसद्वारे आज शेअर केले आहे. त्यामुळे रामराजे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.





