रामराजेंचा फलटणला उद्या अमृतपर्व सोहळा

फलटण – विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटणला मंगळवार, दि. 9 रोजी अमृतपर्व सोहळा होणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी पाच वाजता मुधोजी क्लब मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात येणार आहे.
उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
रामराजे नाईक निंबाळकर अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा समितीने वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून बैलगाडा शर्यत, रक्तदान शिबीर, सायकल रॅली, शेतकरी मेळावा, पैठणी स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, क्रिकेट सामने, चित्रकला स्पर्धा, संकरीत कालवड निवड स्पर्धा आदींचा त्यात समावेश आहे. मंगळवारी, दि.9 मे रोजी फलटण तालुक्यातील प्रमुख 75 मंदिरात जलाभिषेक आणि पूजा करण्यात येणार आहे तसेच ग्रंथतुला आणि कृष्णा नदीतील पाण्याने जलतुला होणार आहे.





