Jambut News : शिरूर तालुक्यात कृषीपंप चोरांचा धुमाकूळ; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
Jambut News : अशा गुन्ह्यांबाबत पोलीस प्रश्नाला गंभीरता नसेल तर शेतकऱ्यांनी याबाबत न्याय कुणाकडे मागायचा असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहे.

जांबूत : शेतकरी ऐन दुष्काळाच्या झळा सोसत असताना पुन्हा एकदा शिरूर तालुक्यातील शरदवाडी, जांबूत परिसरातून कुकडी नदीकाठावरून चार शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये शेतकरी प्रशांत जोरी, किसन नामदेव गांजे, राजेंद्र लक्ष्मण जोरी व नामदेव लक्ष्मण औटी या शेतकऱ्यांचे कृषिपंप चोरीस गेले असून यामध्ये सुमारे साठ हजारांहून अधिकचे नुकसान झाले आहे.
महिनाभरातच घडणारी हि दुसरी घटना असून या घटनामधील चोरट्यांचा तातडीने छडा लावून जेरबंद करण्याची मागणी पैलवान प्रशांत जोरी यांनी केली आहे. याआधीच्या काळात मागील दोन वर्षात पाच ते सहा वेळा शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या कृषीपंप, विद्युत रोहित्र आणि केबल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
मात्र या घटनांतील गुन्हेगारांना जेरबंद करण्यात शिरूर पोलीस स्टेशन आणि टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र यांना सपशेल अपयश आल्याचे दिसून येते. अशा गुन्ह्यांबाबत पोलीस प्रश्नाला गंभीरता नसेल तर शेतकऱ्यांनी याबाबत न्याय कुणाकडे मागायचा असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहे.
चालू वर्षात शेतकरी दुष्काळाच्या दाहकतेला सामोरे जात असताना अशा प्रकारच्या घटना घडल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत असून वारंवार घडणाऱ्या या घटनांवर पोलीस प्रशानाकडून अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनाबाबत शिरूर पोलिसांची पुढील भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काठापूर खुर्द , पिंपरखेड , चांडोह, फाकटे , वडनेर खुर्द , जांबूत , शरदवाडी या परिसरात या आधीच्या घडलेल्या कृषीपंप, विद्युत रोहित्र आणि केबल चोरीच्या घटनावर पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली असा प्रश्न देखील शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
या भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय नाही मात्र गल्ली बोळात आणि चौकाचौकात चालू असलेले अवैध धंदे मात्र राजरोसपणे चालू आहेत, याला अभय कुणाचे हे मात्र समजायला तयार नाही. वारंवार याबाबत आवाज उठवून पोलीस प्रशासनाकडून या अवैध धंद्यांवर कारवाई का केली जात नाही याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या चर्चा सुरू आहे.





