UP: 22 जानेवारीला सर्व शाळा-महाविद्यालये, दारूची दुकाने बंद; योगी सरकारचे आदेश

Uttar Pradesh : श्री रामलला प्राण-प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात ‘राष्ट्रीय उत्सव’ म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 जानेवारीला शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात मद्यविक्री होणार नाही, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी जारी केले आहेत.
अयोध्येत पर्यटकांना अविस्मरणीय आदरातिथ्य मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी आदेशात म्हटले आहे. तसेच 22 जानेवारीला सर्व शासकीय इमारती सजवाव्यात आणि फटाक्यांचीही व्यवस्था करावी. अयोध्येत स्वच्छतेचे ‘कुंभ मॉडेल’ राबवा, असे म्हंटले आहे.
14 जानेवारीला मुख्यमंत्री अयोध्येत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. आज अयोध्येत पोहोचलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभिषेक सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. स्वच्छता आणि सुरक्षेशी तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. व्हीव्हीआयपींच्या विश्रांतीची ठिकाणे अगोदरच ठरवावीत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. अयोध्या धाममध्ये येणार्या भाविक/पर्यटकांना देखील पर्यटक मार्गदर्शक तैनात करण्यास सांगितले आहे जे त्यांना अयोध्येच्या वैभवाची ओळख करून देतील.
22 जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेकासाठी देश आणि जगातील पाहुणे अयोध्येत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्या जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील सर्व हॉटेल्समध्ये पाहुण्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. दुसरीकडे, अयोध्येला लागून असलेल्या लखनऊचे हॉटेलचालकही पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करत आहेत.
लखनौ जिल्हा प्रशासनाने 20 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान लखनऊच्या सर्व हॉटेल्समधून रिकाम्या खोल्यांची यादी मागवली आहे. जेणेकरून लखनौ येथे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातील पाहुण्यांसाठी निवासाची व्यवस्था करता येईल. प्राण प्रतिष्ठा साठी लखनौमधील हॉटेलचे बुकिंग फुल्ल झाले आहे.





