‘रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांना अपमानित केलं….’; नाशिकच्या घटनेवरून जितेंद्र आव्हाड संतापले, ट्विट चर्चेत !

Jitendra Awhad | Ramgiri Maharaj : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत असून महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वत्तव्य केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र मंहत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला असून रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि काही जिल्ह्यात या मागणीवरून तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसले.
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ट्विटकरत आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “काल महंत रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना अपमानित करणारे, त्यांचे चारित्र्य हनन करणारे विधान मुद्दामहून केले, असे माझे मत आहे. कारण, कोणत्याही महंताने कोणत्याही प्रेषिताबाबत असे उद्गार काढणे अशक्य आहे.
काल महंत रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना अपमानित करणारे, त्यांचे चारित्र्य हनन करणारे विधान मुद्दामहून केले, असे माझे मत आहे. कारण, कोणत्याही महंताने कोणत्याही प्रेषिताबाबत असे उद्गार काढणे अशक्य आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत तुम्ही कोणत्याही संतसाहित्य उघडून…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 17, 2024
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत तुम्ही कोणत्याही संतसाहित्य उघडून बघा; संतांच्या अभंगांचे पुस्तक उघडून बघा; संत कबीर, संत रविदास, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पुस्तके उघडून बघा, तुम्हाला कुठेही धर्मद्वेष दिसणार नाही.
किंबहुना, या सर्वांची शिकवणच होती की,सर्व धर्मांनी एकत्र राहिले पाहिजे. असे असताना महंत रामगिरी हे ज्या पद्धतीने बोलले आहेत; त्याकडे पाहता , हे शब्द मुद्दामहून त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले, असेच होते. मी जे म्हणतोय त्याला अर्थ आहे.
कारण, मागे स्वतः मुख्यमंत्री बसलेले असताना, हे महंत एवढे बोलण्याची हिमंत दाखवत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकते. ते जाऊ द्या ! पण, महाराष्ट्रातील धार्मिक तसेच सामाजिक स्वास्थ्य त्यानिमित्ताने हे सत्ताधारी बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही.
हा खेळ आता महाराष्ट्राला जाळून टाकेल; महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडवून टाकेल अन् हा खेळ महाराष्ट्राला परवडणार नाही. सत्ता येते अन् जाते. पण, एकदा मने दुभंगली की ती जोडता-जोडता आयुष्य निघून जाते. या द्वेषाच्या राजकारणापासून आपण सर्वांनीच लांब रहायला हवे.’ या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.





