Ramdas Kadam : …तेव्हा ठाकरे मोदींचे बूट चाटत होते का? रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीवरून केलेल्या टीकेच्या प्रत्युत्तरात कदम यांनी ठाकरेंवर खरपूस शब्दांत हल्ला चढवला. यासोबतच, मुंबई महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मातोश्रीवरून मंत्रालय चालवले
रामदास कदम म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत मंत्रालय फक्त दोनदा पाहिले. त्यांनी मातोश्रीवर बसून मंत्रालयाचे कामकाज चालवले. यावर त्यांनी बोलले पाहिजे.” ठाकरे गटावर भाजपाला बदनाम करण्याचा आरोप करत कदम यांनी सवाल उपस्थित केला की, “संजय राऊत म्हणतात, एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींचे बूट चाटायला गेले. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वपक्षीय शिष्टमंडळासह दिल्लीत गेले होते. तेव्हा त्यांनी सगळ्यांना केबिनबाहेर काढून पंतप्रधान मोदींसोबत एकट्याने भेट घेतली. तेव्हा ते मोदींचे बूट चाटत होते का?”
मुंबई पालिकेवर भगवा फडकेल
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गट उत्तर भारतीय आणि भाजपाला बदनाम करत असल्याचा आरोप कदम यांनी केला. “त्यांना वाटतंय की असे केल्याशिवाय पालिका मिळणार नाही. पण मी ठामपणे सांगतो, मुंबई महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच भगवा फडकेल,” असा दावा त्यांनी केला.
उद्धव स्वत:ला बाळासाहेब समजतात
कदम यांनी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीकाही केली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी रुद्राक्ष बांधून स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजायला सुरुवात केली आहे. त्यांनी वैयक्तिक कामांसाठी दिल्लीत माणसे पाठवली. पंधरा दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला कोण गेले होते, काय प्रस्ताव ठेवला, याची माहिती माझ्याकडे आहे. वेळ आली तर मी यावरही बोलेन,” असा इशारा त्यांनी दिला. या वादामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटातील राजकीय संघर्ष तीव्र झाला असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.





