Ramdas Kadam : बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस…; रामदास कदमांच्या ‘त्या’ दाव्याने उडाली खळबळ

मुंबई : मुंबईतील नेस्को सेंटर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेना (UBT) गटावर सडेतोड टीका केली. मात्र, मेळाव्यात माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या भाषणाने खळबळ उडवली. कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाशी संबंधित धक्कादायक दावे करत त्यांच्या मृत्यूच्या परिस्थिती आणि मृत्युपत्राबाबत प्रश्न उपस्थित केले, ज्यामुळे राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
रामदास कदमांचे खळबळजनक दावे
आपल्या आक्रमक भाषणात रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या वेळी घडलेल्या घटनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन नेमके कधी झाले? त्यांचा मृतदेह मातोश्रीवर दोन दिवस का ठेवण्यात आला? याची सखोल चौकशी व्हावी, अशी माझी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती आहे. मी हे विधान पूर्ण जबाबदारीने करत आहे.” कदम यांनी बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधून याबाबत सत्य समजावून घ्यावे, असे सुचवले. त्यांनी पुढे सवाल केला, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला? त्या काळात मातोश्रीत नेमके काय चालले होते?”
मृत्युपत्र आणि हातांचे ठसे यावर प्रश्न
कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्युपत्राबाबतही संशय व्यक्त केला. ते म्हणाले, “मी त्या काळात आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो. मला सर्व काही माहिती आहे. मला समजले की, बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते. हे ठसे कशासाठी घेतले? बाळासाहेबांचे मृत्युपत्र कोणी बनवले? ते कधी बनवले गेले? त्यावर कोणाची सही होती? या सगळ्याची माहिती समोर यावी.” या विधानांनी मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोपांचा मारा झाला.
ठाकरेंवर हल्लाबोल
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवताना म्हटले, “तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्हीच मोठी केली. आम्ही तुरुंगात गेलो, लाठ्या खाल्ल्या. पण तुम्हीच आम्हाला संपवले. मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते, मी स्वतः रामदास कदम आणि आता एकनाथ शिंदे यांना तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केला.” कदम यांनी ठाकरे गटावर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा आरोप केला आणि शिंदे यांच्या बंडखोरीला पाठिंबा दर्शवला.





