Ramdas Athawale : “पुढचा मुख्यमंत्री ठरला, हायकमांडने…”; रामदास आठवलेंनी सांगितलं ‘त्या’ नेत्याचं नाव

Ramdas Athawale । Maharashtra New CM । राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून महायुतीने राज्यातील सत्तेच्या चाव्या आपलीकडेच ठेवल्या आहेत. मात्र सत्ता जरी महायुतीकडे आली असली तरी बहुमताच्या सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
कारण या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त म्हणजेच 132 जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत ही त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता हा सगळा गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्रीपदासाठी नवनवीन फॉर्म्युले समोर येत आहेत.
मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचं गूढ कायम असताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याबद्दल हायकमांडने निर्णय घेतल्याचं सांगत थेट मुख्यमंत्र्यांचं नावच जाहीर केलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
आठवलेंनी सांगितलं मुख्यमंत्री कोण होणार ते
दिल्लीमध्ये सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आठवलेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेस आठवलेंना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “महायुतीला एवढं मोठं बहुमत मिळालं आहे तरी मुख्यमंत्री कोण हे निश्चित झालेलं नाही,” असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारला गेला.
त्यावर आठवलेंनी, “मुख्यमंत्री कोण हे ठरलं आहे. हायकमांडने देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित केलं असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत,” असं उत्तर दिलं. पुढे बोलताना आठवलेंनी एकनाथ शिंदेंनी केंद्रीय नेतृत्वाकडे भूमिका मांडताना काय म्हटलं आहे हे ही सांगितलं.
ते म्हणाले, एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे की त्यांना अजून थोडा काळ संधी हवी आहे कारण आम्ही चांगलं काम केलं आहे. हे खरं आहे की अडीच वर्षात शिंदेंनी चांगले निर्णय घेतलं आहेत. महाराष्ट्रातील जनतेला समाधानी ठेवलं आहे. महाराष्ट्रातील विजयामध्ये शिंदेंचं मोठं योगदान आहे. देवेंद्र फडणवीसांचंही मोठं योगदान आहे. पक्षाचं म्हणणं आहे की, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे,” असं आठवले म्हणाले.





