अहमदनगर :रामभरोसे ‘करोनामुक्ती’ने वाढविले ‘करोनाबाधित’

पंचवीस दिवसांत आढलले नवे तेरा हजार पॉझिटिव्ह; कोविड सेंटरमधून बाहेर आलेल्यांचा सर्वत्र बिनदिक्कत वावर
विठ्ठल लांडगे
नगर – “बरे झाले’ म्हणून ज्या बाधितांना कोविड सेंटरमधून डिस्चार्च मिळातो, त्यातील बहुतेक रुग्णांमुळेच नव्या करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वास्तविक, ज्यांना कोविड सेंटरमधून करोनामुक्त म्हणून सोडण्यात येते, ते पूर्णत: बरे झालेले नसतात. त्यांनी किमान पुढील सात दिवस होम क्वारन्टाइन राहणे अत्यावश्यक आहे. तथापि, त्यातील बहुतेक करोनामुक्त रुग्ण बरे झाल्याच्या आनंदात बिनदिक्कत रस्त्यांवर फिरतात. त्यामुळेच जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या आता थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.
नगर जिल्ह्यात एक जुलै 2020 पर्यंत अवघे 475 करोनाबाधित होते. त्यानंतर ही संख्या हळूहळू वाढत होती. 30 जुलैपर्यंत करोनाबाधितांची संख्या चार हजार 613 पर्यंत पोचली. म्हणजे पूर्ण महिन्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत अवघी चार हजार सहाशेंची भर पडली होती.
ऑगस्टच्या पहिल्याच दिवसापासून नव्या करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली. एक ऑगस्टला नगरमधील रुग्णसंख्या पाच हजार 508 होती. ती आज (दि. 25) तब्बल 17 हजार 583 पर्यंत पोचली आहे. म्हणजे अवघ्या 25 दिवसांत नवे तेरा हजार रुग्ण वाढल आहेत. सामूहिक संसर्ग नसल्याचा दावा वैद्यकीय यंत्रणा करते. मग नगर जिल्ह्यात दिवसाला साधारण साडेपाचशे रुग्ण कसे वाढत आहेत, या प्रश्नावर वैद्यकीय यंत्रणेकडे समाधानकारक उत्तर मिळत नाही.
दरम्यान, दररोज जेवढे नवे करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत, त्यापेक्षा थोडे कमी अथवा तेवढ्याच रुग्णांना करोनामुक्त म्हणूनही घोषित करण्यात येत आहे, हे विशेष. करोना विषाणूच्या चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्याही वाढत चालली असल्याचे तकलादू उत्तर वैद्यकीय यंत्रणेकडून मिळते. शिवाय सरकारीसोबत खासगी लॅबमध्येही तपासणी होत असल्याने ही संख्या दिसते, असा दावा वैद्यकीय यंत्रणा करते. मात्र, नगरमध्ये खूप आधीपासूनच खासगी लॅबमध्ये चाचणीस परवानगी मिळाली होती. त्यामुळे वाढणारे नवे रुग्ण “रामभरोसे करोनामुक्त’ झालेल्यांमुळे वाढत असल्याचाही दावा करण्यात येत आहे.
“बूथ’मधील करोनामुक्त रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू नगरमधील सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण सेवाभावी असलेल्या बूथ हॉस्पिटलमधून करोनामुक्त झाले. मात्र, तेथून करोनामुक्त म्हणून बाहेर पडलेल्या काही जणांवर पुन्हा खासगी रुग्णालयांत उपचार करण्याची वेळ आलेली आहे. सात दिवस उपचार घेतल्यानंतर एका तरुणास चार दिवसांपूर्वी तेथून डिस्चार्ज मिळाला. तो रुग्ण बरा होण्याऐवजी आता शहरातीलच एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. परंतु, तो रुग्ण बरा झाल्याचा अहवाल कसा दिला जातो, असा पेच निर्माण झाला आहे.
करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला तातडीने कोविड सेंटरमध्ये क्वारन्टाइन करणे अत्यावश्यक ठरते. त्याच्यापासून अन्य कुणाला संसर्ग होऊ नये व त्यालाही धोका होऊ नये, हा त्यापाठीमागे हेतू असतो. पहिले सात दिवस त्याला वैद्यकीय निरानीखाली ठेवून उपचार केले जातात. सात दिवसांत आजार बळावल्याची कोणतीही लक्षणे नसल्यास त्यास पुढील आणखी सात दिवस “होम क्वारन्टाइन’ राहण्याची सूचना करून सोडले जाते. त्या सात दिवसांत काहीही त्रास न झाल्यास तो बरा झाला, असे म्हणण्यास हरकत नाही. मात्र, आणखी 14 दिवस त्याला काळजी घ्यावी लागेलच. रुग्णाच्या शरीरात करोना विषाणू 28 दिवस असू शकतो. तोपर्यंत त्याचा अहवाल निगेटिव्ह येईलच, असेही नाही.
डॉ. सतीश राजूरकर,उपआरोग्य अधिकारी, महापालिका, नगर.
हॉटेलिंग बिनदिक्कत…!
नगरमधील काही भागांत हॉटेल व्यवसाय जोमात सुरू झाला आहे.तेथे प्रवेश केल्यास करोना काहीच करू शकत नाही, असा भास होतो. बहुतेकांच्या तोंडला मास्क नाहीत. अगदी बिनधास्तपणे येथील व्यवहार सुरू असतात. या परिसरात करोना विषाणू आलाच, तर त्याला ग्लासांच्या मधोमध टेबलवरच चिरडून मारतील, अशी अवस्था पाहायला मिळते. त्यामुळे हे कोण रोखणार? असा सवाल उपस्थित होत आहे. नगरमध्ये करोना विषाणू बोकाळण्यास महत्त्वाच्या कारणांपैकी हे एक कारण असावे, असे बोलले जाते.
करोना विषाणूचा संभ्रम आता मुख्यमंत्र्यांनीच दूर करावा…!
नगर शहरातील काटवन खंडोबा भागातील एका तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून करोना विषाणूचा संभ्रम दूर करावा, अशी विनवणी केली आहे. त्या तरुणाचा महापालिका व एक संस्थेमार्फत करण्यात आलेल्या करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दुसरीकडे त्याच दिवशी त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी स्वॅब दिला होता. तेथे त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. दरम्यान, दोन्ही अहवाल घेऊन हा तरुण एका खासगी रुग्णालयात गेला. तेथे त्यास सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी नेमके काय करू, कोणता अहवाल खरा मानू आणि उपचार घेऊ की नको, याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनवणी त्या तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवून केली आहे.





