छत्तीसगड विधानसभा अध्यक्षपदासाठी रमणसिंह यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी आज नवनिर्वाचित राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. १९ डिसेंबरपासून सुरू होणार्या छत्तीसगडच्या सहाव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनासाठी भाजपचे ज्येष्ठ आमदार रामविचार नेताम यांना राज्यपालांनी प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली आहे. त्यांच्या नेतृत्वात नवीन आमदारांचा शपथविधी होईल आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल.
७१ वर्षीय रमण सिंह हे राजनांदगाव मतदार संघातून विधानसभेवर विजयी झाले आहेत. ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती. पण पक्षाने त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी सिंग यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे प्रस्ताव सादर केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आपण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी पार पाडू असे रमणसिंह यांनी नमूद केले आहे. आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस नेते महंत आणि बघेल यांचे आभार मानले.





