Ram Shinde : मी पूर्वनियोजित कटाचा बळी ठरलो; राम शिंदेचा यांचा आरोप

जामखेड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा मागूनही दिल्या नाहीत. पवारांच्या कौटुंबिक कलहादरम्यान जे अघोषित करार झाले, त्याची अंमलबजावणी होण्याचे प्रकार कर्जत-जामखेडमध्ये झाले. मी नियोजित कटाचा बळी ठरलो, असा आरोप राम शिंदेंनी पत्रकार परिषद करत थेट अजित पवारांवर संशय व्यक्त केला.
कराड येथे प्रीतिसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आमदार रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी अजित पवारांनी रोहित पवार यांना कानपिचक्या देत पाया पडायला लावले. तेव्हा रोहित पवार त्यांच्या पाया पडले. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं, असा टोला अजित पवार यांनी रोहित पवार यांना मारला. याचा अर्थ हा नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेल्याचा आरोप शिंदे यांनी केला. त्यांच्या कौटुंबिक कलहाच्या दरम्यान जे अघोषित करार झाले, त्याची अंमलबजावणी होण्याचे प्रकार कर्जत-जामखेडमध्ये झाले.
महायुतीचा धर्म मोठ्या नेत्यांनी पाळणं अपेक्षित आहे. राज्यात पराभव झालेल्या उमेदवारांच्या यादीत चौथ्या क्रमाकांची १ लाख २६ हजार ४३३ मतं मला पडली. कमी मताच्या फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझा सहावा क्रमांक लागतो. या कटाचा आणि अघोषित कारवाईचा मी बळी ठरल्याचं सिद्ध झालं आहे. यावर वरिष्ठांनी गांभीर्याने विचार विनिमय करावा, ही माझी अपेक्षा असल्याचं राम शिंदे म्हणाले.
न्यायालयात याचिका दाखल करणार
फेरमतमोजणी संदर्भात मी अर्ज दिला होता, रिटर्निंग ऑफिसरने तो स्वीकारला नाही. त्याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणार आहे. त्यावर काय निर्णय घेतात, यावरून मी कारवाई ठरवेन, कारण कमी फरकाने पराजय झाला आहे. माझा पडताळणीचा अर्ज स्वीकारला, पण त्याआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. ही मोठी चूक रिटर्निंग ऑफिसरने केली. यासंदर्भात मी याचिकाही दाखल करणार असल्याचे राम शिंदेंनी स्पष्ट केलं.




