कर्जत : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्यात लढत पार पडली होती. या लढतीत रोहित पवार यांनी विजय मिळवला होता. ही लढत फार अटीतटीची झाली होती. शेवटच्या क्षणी रोहित पवारांनी १२०० मतांनी आघाडी घेत विजय मिळवला होता. यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी रोहित पवार यांना अजित पवारांनी माझी सभा झाली नाही, म्हणून वाचलास, असे म्हटले होते. यावरून राम शिंदे यांनी कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार यांच्याकडे मागणी करत होतो. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं?, असं अजित पवार बोलले, म्हणजे हा सुनियोजित कट होता, असा आरोप राम शिंदे यांनी केला होता. यानंतर आता राम शिंदे यांनी अजित पवारांचे नाव घेत एक मोठं वक्तव्य केले आहे. काय म्हणाले राम शिंदे? एक निवडणूक झाली, पराजय झाला. दुसरी निवडणूक झाली, मी 622 मतांनी पडलो. आता जवळ आलो आणि हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस जातो त्यावेळी माणसाच्या मनात भावना निर्माण होते की पुढच्या वेळेस मी सोडणार नाही. त्यामुळे आता 2029 ला मी कर्जत जामखेडमधून लढायला तयार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी माझा प्रचार केला नाही. हे अजित पवारांनी सांगितले आहे. आता पुढच्या वेळेस करतील का? नाही हे त्यावेळेस ठरेल, असे राम शिंदे म्हणाले.