Viral Video : पार्ले-जी बिस्किटांपासून बनवलं राम मंदिर; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

Ram Mandir : भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अनेक दशकांच्या संघर्ष, समर्पण आणि प्रतिक्षेनंतर भव्य राम मंदिराचा अभिषेक सोहळा होणार आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा एक दिव्य अनुभव असेल, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल. प्राचीन मंत्रोच्चार, भजन-कीर्तन, देवतांचा अभिषेक, मंदिर परिसरात दीपप्रज्वलन यामुळे संपूर्ण अयोध्या भक्तीमय होऊन जाणार आहे.
दरम्यान, याच सोहळ्याचं औचित्य काहीजण अनोख्या पद्धतीने प्रभू श्रीराम यांच्याप्रती आपली भक्ती दाखवत आहेत. अशातच पश्चिम बंगालच्या एका तरुणाने असा कलाविष्कार दाखवला आहे, जो पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत. या तरुणाने पार्ले-जी बिस्किटांपासून राम मंदिराची छोटी प्रतिकृती बनवली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नेटकरी यावर लाईक्स आणि कमेंटचा भडीमार करत आहेत.
View this post on Instagram
बिस्किटांपासून राम मंदिराची प्रतिकृती बनवणाऱ्या या तरुणाचं नाव छोटन घोष असं आहे. चार बाय चार फूटची ही प्रतिकृती बनवण्यासाठी त्याने 20 किलो पार्ले-जी बिस्किटांचा वापर केला. तर हे मंदिर बनवण्यासाठी त्याला पाच दिवस लागले. या प्रतिकृतीमध्ये बिस्किटांसोबतच थर्माकोल, प्लायवूड आणि डिंकाचा वापर केला आहे.
ही प्रतिकृती इतकी सुंदर बनवली आहे की त्यावर सर्वच जण कमेंट करून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तीन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत जवळपास दोन कोटींपेक्षाही जास्त व्ह्यूज आणि 26 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.





