पुणे | महायुतीची एकजूट साधत आढळराव पाटील यांची रॅली

पुणे – एकच वादा.. शिवाजीदादाचा नारा, कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष, ढोल-लेझीमच्या तालावर, घोषणांच्या आरोळीत महायुतीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अभूतपूर्व प्रतिसादात वाजत-गाजत जल्लोषात शिरुर लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
बालगंधर्व चौक ते डेक्कन जिमखाना दरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही रॅली मार्गस्थ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजप, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षांचे झेंडे रॅलित सहभागी केले होते. अबकी बार चारसो पार.. आमचे उमेदवार आमचे दादा.. निवडून येणार शिवाजी दादा, एकच वादा शिवाजी दादा.. अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार, भोसरीचे आमदार महेश लांडगे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, हडपसरचे आमदार चेतन तुपे, माजी आमदार विलास लांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपच्या नेत्या आशा बुचके,
शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीची सांगता गुडलक चौक येथे सभेने झाली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, आदींनी सभेला संबोधित केले.
ग्रामदैवताचे घेतले दर्शन
लांडेवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे चरणी लीन होऊन महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी गावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी लांडेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान आढळरावांच्या सुविज्ञ पत्नी कल्पनाताई आढळराव यांनी लांडेवाडी येथील राहत्या घरी औक्षण केले आणि विजयश्रीच्या शुभेच्छा दिल्या.





