राज्यसभा निवडणूक: भाजपचे चार केंद्रीय मंत्री मैदानात, कॉग्रेसचे आमदार अभेद्य किल्ल्यात

नवी दिल्ली (वंदना बर्वे) – भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील तिसरा उमेदवार निवडून आणण्याचे जोखड रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या खांद्यावर ठेवले आहे. तर, कॉग्रेसने बंडखोरी आणि फोडाफाडीच्या भीतीने हरियाणा आणि राजस्थानमधील आमदारांना सुरक्षित स्थळी नेउन ठेवले आहे.
राज्यसभा निवडणुकीची तारिख जसजशी जवळ येत आहे देशाच्या राजकारणाचा पारा उच्चांक गाठत आहे. भारतीय जनता पक्षाने काल बुधवारी चार केंद्रीय मंत्र्यांची प्रभारी म्हणून नेमणूक केली. यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (महाराष्ट्र), नरेंद्रसिंग तोमर (राजस्थान), गजेंद्रसिंग शेखावत (हरियाणा) आणि जी. किशन रेड्डी (कर्नाटक) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पियूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तिन्ही उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी अश्विनी वैष्णव यांच्यावर आहे.
तर दुसरीकडे, कॉग्रेसने बंडखोरी आणि फोडाफोडीचा प्रकार टाळण्यासाठी आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी नेउन ठेवले आहे. हरियाणा आणि राजस्थानमधील आमदारांची अभेद्य किल्ल्यात रवानगी करण्यात आली आहे. हरयाणातील 28 आमदारांना रायपूरमध्ये नेउन ठेवले आहे.
कॉग्रेसने हरयाणातील सर्व 31 आमदारांना दिल्लीला बोलाविले होते. परंतु, कुलदीप बिश्नोइ, किरण चौधरी आणि चिरंजीव राव हे दिल्लीला पोहचले नाहीत. उर्वरित 28 आमदारांना चार्टर फ्लाईटने रायपूरला पाठविण्यात आले आहे. तत्पूर्वी, महासचिव वेणुगोपाल यांनी विरोधी पक्षनेते दीपेंद्र हुडा यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक घेतली होती. छत्तीसगडमध्ये कॉग्रेसचे सरकार आहे, हे येथे उल्लेखनीय.
राजस्थानमध्ये सुध्दा कॉग्रेस आणि मित्र पक्षांच्या आमदारांना सुरक्षित स्थळी पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मागच्या महिन्यात चिंतन शिबिर झाले त्याच हॉटेलमध्ये सर्व आमदारांना ठेवले जात आहे.





