ठाकरेंना पुन्हा धक्का! गेल्या आमदारकीला पक्षाकडून उभा राहिलेल्या बड्या नेत्याने साथ सोडली, राजीनामा पत्रात सगळं सांगितलं

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाला आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठे धक्के बसत आहेत. कोकणानंतर आता मराठवाड्यातही पक्षाला घरघर लागली असून, प्रमुख नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत. औरंगाबाद पश्चिममधून विधानसभेची निवडणूक लढवलेले आणि शिवसेना (शिंदे गट) चे मंत्री संजय शिरसाठ यांच्याविरुद्ध रिंगणात उतरलेले राजू शिंदे यांनी अखेर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत पक्ष सोडला आहे. चंद्रकांत खैरे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत राजू शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (उबाठा) चे सदस्यत्व आणि विधानसभा प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपला निर्णय कळवला. “मी आणि माझे सहकारी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात आलो होतो. मला विधानसभेची उमेदवारी देऊन तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल मी आभारी आहे. पण काही कारणांमुळे आणि चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल असलेल्या नाराजीतून मी हा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या घडामोडीमुळे मराठवाड्यात ठाकरे गटाला आणखी एक जोरदार झटका बसला आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांनी औरंगाबाद पश्चिममधून जोरदार लढत दिली होती. त्यांना 1 लाख 6 हजार 147 मते मिळाली, पण संजय शिरसाठ यांनी 1 लाख 22 हजार 498 मतांसह त्यांचा 16,351 मतांनी पराभव केला. तरीही, छत्रपती संभाजीनगरमध्ये राजू शिंदे हे शिवसेना (उबाठा) चे प्रमुख चेहरा मानले जात होते. आता त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. राजू शिंदे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता आहे. ते महायुतीतील एखाद्या पक्षात जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे, पण याबाबत त्यांनी अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत.




