शेट्टी यांचे नाव कापले नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

चाळीसगाव – विधान परिषदेच्या 12 जागांसाठी राज्यपालांकडे पाठवलेल्या यादीतील कोणाचेही नाव कमी केले नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी केला. चाळीसगावमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पाटील येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीकाटिप्पणी करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्तीसाठी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जयंत पाटील म्हणाले, विविध माध्यमांत शेट्टी यांचे नाव वगळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्या 12 आमदारांच्या यादीतून कोणाचेही नाव वगळलेले नाही. त्यामुळे शेट्टी यांचे माव वगळण्याचा प्रश्न येतच नाही.
आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना विनंती केलेली आहे. तीनही पक्षांच्या सहमतीने राज्यपालांना प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर राज्यपालांनी लवकर निर्णय घावा. लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत, असे महाराष्ट्रातील जनतेला वाटात आहे. बराच काळ ऊलटूनही त्यावर निर्णय होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई संदर्भात पाटील म्हणाले, ईडी या देशात विरोधी पक्षावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत असते. कुणाची कोणतीही चूक नसतांना ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणाचा वापर विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी केला जातोय. त्यामुळे चूक नसतांना कारवाई करणे आणि बदनामी करणे किंवा प्रभावित करणे सूरु आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलतांना जयंत पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य निवडणुकांपुर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा. अशी आमच्या तीनही पक्षाची भूमिका आहे. त्यासाठी सर्व पक्षीय बैठकीत साधक-बाधक चर्चा झाली आहे. त्यामुळे नवीन काही बोलण्याचा प्रश्न नाही.





