…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचे समर्थन – राजू शेट्टी

सीएए संविधानाच्या विरोधातील कायदा
औरंगाबाद – स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुकारलेल्या मोर्चाची मागणी बाहेरच्या देशातील घुसखोरांना हाकलून द्या एवढीच असेल, तर आमचा राज ठाकरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, बाहेरच्या देशातून जे घुसखोर येतात त्याचं समर्थन कुणीही करणार नाही. आम्हीही करत नाही. त्यामुळे बाहेरच्या घुसखोरांना हुसकाऊन लावा इतकी राज ठाकरेच्या मोर्चाची मागणी असेल, तर आमचा त्याला पाठिंबा आहे. परंतु केंद्र सरकार आज नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत आहे. सीएए हा तर सरळसरळ संविधानाच्या विरोधातील कायदा आहे.
संविधानाने या देशात जात, धर्म, लिंग आणि पंथ या आधारावर कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव केला जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. सीएए कायदा या आश्वासनाला हरताळ फासणारा आहे. एनआरसीमध्ये जवळपास 40 टक्के लोकांना आपला जन्माचा पुरावाच देणे अशक्य आहे. माझेच उदाहरण सांगतो. 52 वर्षांपूर्वी माझा जन्म माझ्या घरात झाला. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये जन्म झालेला नाही. त्यामुळे माझा स्वतःचाच जन्माचा दाखला नाही. मी दोनवेळा खासदार, एकदा आमदार आणि एकदा जिल्हा परिषद सदस्य होतो. माझ्यासारख्याची अशी अवस्था असेल, तर सर्वसामान्य जनतेचं काय आहे, असेही राजू शेट्टी यांनी नमूद केले.





