Raju Shetti : कोकणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आंबा व काजू फळ पिकाचा मोहोर गळून पडल्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचपार्श्वभूमीवर पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आंबा व काजूच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायला फक्त तीन दिवस बाकी आहेत आणि अद्यापही आंबा व काजू बांगायतादारांना नुकसान भरपाई जाहीर झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. राजू शेट्टी म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे यंदा हापूस आंब्याचे केवळ 10 टक्के पीक शिल्लक राहिले आहे. त्यामुळे आंबा पिकाला हेक्टरी 5 लाख आणि काजू पिकाला हेक्टरी 3 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी यापूर्वी वेंगुर्ले व देवगड येथे मेळावे आणि ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित असलेल्या पालकमंत्र्यांनी दोन दिवसांत आंबा व काजू बागायतदारांना भरपाई मिळवून देतो, अशी ग्वाही दिली होती. मात्र त्याला आज दहा दिवस झाले आहेत. तसेच येत्या 25 मार्च रोजी अधिवेशन संपुष्टात येणार आहे. मात्र तरीही नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता आंबा बागायतदारांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असा इशारा त्यांनी दिला.