जयपूर : राजस्थानात बसपाचे 6 आमदार कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ही माहीती दिली आहे. बसपाच्या या सर्व आमदारांनी कोणत्याही अटीशिवाय अथवा लाभाच्या अपेक्षेशिवाय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे पायलट यांनी सांगितले.
“राजस्थानातील आमच्या सरकारचा विकासाचा वेग बघून जर कोणी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करू इच्छित असेल, तर त्याला कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही.’ असे पायलट म्हणाले. मंत्रीपद किंवा अन्य कोणतेही पद मिळण्याच्या आशेने किंवा अटीवर यापैकी कोणीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. यापूर्वी बसपाच्या या आमदारांचा कॉंग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा होता. मात्र जर कॉंग्रेस पक्षात येऊन सरकारला पाठिंबा दिला, तर त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी ते फायद्याचे होईल, असे या आमदारांना वाटले असावे, असेही पायलट यांनी सांगितले.
सोमवारी संध्याकाळी एकाच वेळी सर्व 6 आमदारांनी बसपा सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणे हा बसपासाठी मोठा धक्का आहे. राजस्थानातील बसपाच्या सर्व आमदारांनी एकाचवेळी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे य आमदारांवर पक्षांतर बंदी विरोधी कायद्यानुसार कारवाई होणार नाही.