Akshay Kumar : राजीव बनला बॉलिवूडचा ‘खिलाडी कुमार’! वेटर म्हणून केलं काम; ती एक संधी मिळाली अन् आयुष्यच बदललं
Akshay Kumar : अक्षय कुमारचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी अमृतसरमध्ये भाटिया कुटुंबात झाला. हरि ओम भाटिया आणि अरुणा भाटिया असे त्याच्या आई वडिलांचे नाव.

Akshay Kumar : बॉलिवूडचा ‘खिलाडीकुमार’ आणि चाहत्यांचा लाडका अभिनेता अक्षय कुमार आज ५९ वर्षांचा झाला आहे. गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने आणि दमदार व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अक्षयने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ॲक्शनपासून कॉमेडी, रोमँटिक आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांपर्यंत त्याने विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाची दखल प्रेक्षकांना घ्यायला भाग पाडलं.
दीड वर्ष विनावेतन काम
अक्षय कुमारचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी अमृतसरमध्ये भाटिया कुटुंबात झाला. हरि ओम भाटिया आणि अरुणा भाटिया असे त्याच्या आई वडिलांचे नाव. आज जरी सगळेजण त्याला अक्षय कुमार म्हणून ओळखत असले तरी त्याचे खरं नाव राजीव भाटिया असे होते. बॅालिवूडमध्ये संधी शोधत असताना अक्षयला १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘आज’ चित्रपटात काम मिळाले. त्याने या चित्रपटात एका कराटे प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका संजय दत्तचा मेहुणा आणि अभिनेता कुमार गौरव याने साकारली होती. गौरवच्या पात्राचे नाव अक्षय होते. त्यानंतर अक्षयने आपले नाव राजीव भाटियावरून बदलून अक्षय कुमार असे ठेवले.
दीड वर्ष एका फोटोग्राफरकडे विनावेतन काम केले
बॉलिवूडमध्ये ॲक्शन स्टार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अक्षयने नंतर आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आणि रोमँटिक भूमिकांमध्येही तो लोकप्रिय ठरला. मात्र, त्याचा प्रवास सोपा नव्हता. बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याने विविध प्रकारची कामे केली. आपले मॉडेलिंग पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी त्याने दीड वर्ष एका फोटोग्राफरकडे विनावेतन काम केले होते. अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अक्षयने भारत आणि बँकॉक येथे वेटर आणि शेफ म्हणून काम केले होते. त्याने एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये दागिने विकण्याचे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही केले.
‘मोहरा’मुळे मोठी लोकप्रियता
अक्षयला १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आज’ या चित्रपटात छोटेखानी भूमिका मिळाली. त्यानंतर त्याने १९९१ मध्ये ‘सौगंध’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला त्याच्या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. मात्र, १९९२ मध्ये आलेल्या ‘खिलाडी’ या चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा दिली. पुढे ‘मोहरा’ या चित्रपटाने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ‘खिलाडी’च्या यशानंतर अक्षयच्या नावासोबत ‘खिलाडी’ हे टोपणनाव कायमचे जोडले गेले. ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘सबसे बड़ा खिलाडी’, ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’, ‘इंटरनॅशनल खिलाडी’, ‘खिलाडी ४२०’ आणि ‘खिलाडी ७८६’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने या नावाची लोकप्रियता आणखी वाढवली.
गंभीर भूमिकाही साकारल्या
अक्षयने आपल्या कारकिर्दीत केवळ ॲक्शन स्टार म्हणूनच नव्हे, तर कॉमेडी आणि गंभीर भूमिकांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’, ‘वेलकम’, ‘मुझसे शादी करोगी’ यांसारख्या विनोदी चित्रपटांनी त्याची कॉमिक टाइमिंग प्रेक्षकांसमोर आणली. तर ‘धडकन’, ‘केसरी’, ‘मिशन मंगल’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘गुड न्यूज’ आणि ‘सूर्यवंशी’ यांसारख्या चित्रपटांनी त्याच्या अभिनयाची विविधता दाखवून दिली.
खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत
अक्षय कुमारच्या वैयक्तिक आयुष्याचीही बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा रंगायची. रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी यांच्यासोबत त्याचे नाव जोडले गेले होते. मात्र, अखेर त्याने अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत जानेवारी २००१ मध्ये विवाह केला. या दाम्पत्याला आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वाधिक व्यस्त अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. वर्षाला अनेक चित्रपट करण्यासाठी तो ओळखला जातो. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ तो सातत्याने मुख्य भूमिकांमध्ये दिसत असून, आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने देश-विदेशात मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. संघर्षाच्या काळात वेटर आणि शेफ म्हणून काम करणाऱ्या एका तरुणापासून ते बॉलिवूडच्या आघाडीच्या सुपरस्टारपर्यंतचा अक्षय कुमारचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आज ५९ व्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







