राजगुरुनगर: शहिद दिनानिमित्त राजगुरुनगर येथे हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना स्मृतीस्थळावर अभिवादन

राजगुरुनगर: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या पुण्यस्थिती (शहिद दिन) निमित्त राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरु स्मृतीस्थळ आणि हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ वाड्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
येथील हुतात्मा स्मृती शिल्पातील हुतात्मा राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांच्या पुतळ्यास म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ वाड्यावर उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पोलिस उपअधीक्षक अमोल मांडवे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, नायब तहसीलदार राम बीजे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सत्यशील राजगुरू, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, भाजपचे राम गावडे, माजी सरपंच शांताराम घुमटकर, शिवसेनेच्या विजया शिंदे, गणेश सांडभोर, हुतात्मा राजगुरू ट्रस्ट चे कोंडीभाऊ टाकळकर, मुकुंद आवटे, प्राचार्य शिरीष पिंगळे, जि.र शिंदे, मारुती सातकर, सुनील वाळुंज, बाळासाहेब सांडभोर, विनायक घुमटकर, नरेंद्र गायकवाड, सुशील मांजरे यांच्यासह विविध पक्ष, संघटना, संस्था यांचे पदाधिकारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





