Khed Crime : मामाचा कोयत्याने खून करून भाच्याने घेतला गळफास; राजगुरुनगर हादरले
Khed Crime : राजगुरुनगरच्या माधवनगर परिसरात भाच्याने मामाचा कोयत्याने खून केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेचा खेड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Khed Crime : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये मामा-भाच्याच्या नात्याला धक्का देणारी घटना शनिवारी सकाळी घडली. आजारपणामुळे उपचार आणि देखभालीसाठी भाच्याच्या घरी राहण्यासाठी आलेल्या मामाचा धारदार कोयत्याने वार करून खून केल्यानंतर भाच्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप वामन गडदे (वय ४३) असे मृत मामाचे, तर प्रवीण कैलास कोहिणकर (वय २०) असे भाच्याचे नाव आहे.
राजगुरुनगर येथील माधवनगर परिसरात ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, संदीप गडदे हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. उपचार व देखभालीसाठी ते सुमारे दोन महिन्यांपूर्वी भाचा प्रवीणच्या घरी राहण्यासाठी आले होते. शनिवारी प्रवीणने धारदार कोयत्याने मामाच्या गळ्यावर वार केला. यात संदीप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
यानंतर प्रवीणनेही त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना प्रवीणने लिहिलेली सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात ‘मामाच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत आहे,’ असा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मामाचा त्रास नेमका कशामुळे होता आणि या घटनेमागील कारण काय, याचा तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
टीप : आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही. मानसिक तणाव किंवा संकटाच्या काळात एकटे राहू नका. कुटुंबीय, मित्र किंवा विश्वासातील व्यक्तीशी बोला आणि तातडीने मदत घ्या. भारतात टेलि-मानस हेल्पलाइन १४४१६ वर संपर्क साधता येतो.





