राजगुरूनगर | शहरातील संगम कपड्याच्या दुकानाला भीषण आग

राजगुरूनगर – येथील संगम कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने आगीत मोठे नुकसान झाले. उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे असलेले राजगुरुनगर शहरातील संगम कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) मधील व राजगुरूनगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या वतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र १ तासापासून लागलेल्या भीषण आगीवर अजूनही नियंत्रण आले नाही.
घटनास्थळी खेड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी वाहतूक रोखून आगीच्या बंब जाण्या-येण्यासाठी रस्ते मोकळे केले. राजगुरूनगर शहरातील मोठ्या संख्येने नागरिक मदत कार्य हाती घेतले आहे. आगीचे लोट अजूनही कायम सुरू असून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यात नावाजलेल्या दुकानाला आग लागल्याने शहरातील नागरिकांनी दुकानजवळ मोठी गर्दी जमा केली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली मात्र नागरिक ऐकत नसल्याने पोलिसही त्यापुढे हतबल झाले. आगीने उग्र स्वरूप धारण केले असून पुण्यावरून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे. दुकानात कपडे असल्याने आगीने आखे दुकान काबीज केले आहे.





