Rajgad News: राजगड तालुक्यात मुसळधार! मार्गासनी येथे शाळा, अंगणवाडीसह ग्रामपंचायत कार्यालय पाण्याखाली
Rajgad News: पावसाळ्यापूर्वी सूचना देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; निष्काळजी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची माजी सरपंचांची मागणी.

Rajgad News – राजगड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी (दि. ३१) नसरापूर–वेल्हे मार्गावरील मार्गासनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पावसाचे पाणी शिरले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालय हे मुख्य रस्त्यालगत असून, रस्त्यावरील गटारे व नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई आणि दुरुस्ती न झाल्याने पावसाचे पाणी थेट या परिसरात घुसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाण्याचा प्रवाह इतका वाढला होता की, विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांमधून बाहेर पडणेही कठीण झाले होते. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असून पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
“पावसाळ्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला गटारे व नाल्यांची साफसफाई करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभाराचा परिणाम असून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी.”
– विशाल वालगुडे, माजी सरपंच तथा भाजप राजगड तालुका उपाध्यक्ष.





