राज्यसभेच्या निवडणुकीवेळी 25 कोटींची ऑफर होती; मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

जयपूर – राजस्थानातून राज्यसभेवर पाठवल्या जाणाऱ्या जागांसाठी गेल्याच महिन्यात मतदान झाले. त्यावेळी एका मतासाठी 25 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा राजस्थानातील एका मंत्र्याने केला आहे. बहुजन समाज पक्षातून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले राजस्थानचे सैनिक कल्याण राज्यमंत्री राजेंद्र गुढा यांनी हा दावा केला आहे.
इतकेच नाही, तर 2020 मध्ये जेव्हा राजस्थानात राजकीय संकट निर्माण झाले होते तेव्हाही 60 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली होती, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र आपल्याला आदर कमवायचा आहे, पैसा नाही असे कुटुंबातील सदस्यांनी आपल्याला सांगितल्यामुळे आपण ती ऑफर नाकारली असे त्यांनी नमूद केले. मात्र ऑफर कोणी दिली होती हे त्यांनी उघड केले नाही.
एका कार्यक्रमात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हे दावे केले. ते म्हणाले की राज्यसभा आणि त्या अगोदर राज्यातले राजकीय संकट या दोन्ही वेळा अशा ऑफर आल्या. तेव्हा कुटुंबातील सदस्यांशी मी चर्चा केल्यावर त्या सगळ्यांनी याचा विरोध केला. जेव्हा तुम्ही ज्यांच्यासोबत राहतात ते असा विचार करतात तेव्हा भ्रष्टाचार आपोआप संपतो असा दावा त्यांनी केला. सचिन पायलट गटाने अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंडाची तलवार उपसली होती. तेव्हा गुढा गेहलोत यांच्यासोबतच होते. पायलट यांचे बंड तेव्हा फसले होते. त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष पद गमवावे लागले होते.





