Rajendra Dheringe Bribe Case : राष्ट्रवादीचे नेते व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीने छापा टाकला होता. या कारवाईत लिपीक राजेंद्र ढेरंगे (Rajendra Dheringe Bribe Case) याला ३५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने राजेंद्र ढेरिंगे यांच्या नाशिक येथील (नाशिकरोड) घराची झडती घेतली. या झडतीतून एसीबीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय नवीन माहिती समोर येते हे पाहावे लागणार आहे. मेडीकल दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई टाळण्यासाठी थेट अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातच लाच घेतल्याचा प्रकार झाल्याने विरोधकांकडून थेट झिरवाळ यांच्याच राजीनाम्याची मागणी होत आहे. खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरुन आपण लाच स्विकारल्याचा दावा राजेंद्र ढेरिंगे यांनी केल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकरणानंतर लाच घेणारा कर्मचारी राजेंद्र ढेरिंगे याच्या विरोधात केवळ चौकशीच नव्हे तर त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देशही मंत्री झिरवाळ यांनी दिले आहेत. तसेच लाचखोर राजेंद्र ढेरिंगे यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. राजेंद्र ढेरिंगे हे मूळ अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहे.