#IPL2022 #LSGvRCB Eliminator | पाटीदारचे वादळी शतक, बेंगळुरुचा लखनौसमोर धावांचा डोंगर

कोलकाता – रजत पाटीदारचे वादळी शतक व दीनेश कार्तिक आणि विराट कोहली यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्ससमोर पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 207 धावांचा डोंगर उभा केला.
लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत बेंगळुरुला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. मोहसिन खानच्या पहिल्याच षटकात बेंगळुरुचा कर्णधार पाफ डुप्लेसी बाद झावा मात्र, त्यानंतर लखनौला सामन्यावर नियंत्रण राखता आले नाही. कोहलीने त्यानंतर रजत पाटीदारला सुरेख साथ दिली व डाव सावरताना संघाला अर्धशतकी मजल मारुन दिली.
कोहली स्थिरावलेला असताना आवेश खानच्या गोलंदाजीवर अनावश्यक फटका मारुन 24 चेंडूत 2 चौकारांसह 25 धावा करुन बाद झाला. कृणाल पंड्याने भरात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला बाद केले तर रवी बिष्णोईने महिपाल लोमरोरचा अडथळा दूर केला. त्यावेळी पाटीदारने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देण्यासाठी यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळी करत असलेला दीनेश कार्तिक खेळपट्टीवर आला व या दोघांनी लखनौच्या गोलंदाजांची पीसे काढली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 92 धावांची अखंडीत भागीदारी केली.
पाटीदीरने वादळी खेळी करत आपले शतकही पूर्ण केले. त्याने नाबाद 112 धावांच्या खेळीत अवघ्या 54 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 7 षटकारांची आतषबाजी केली. कार्तिकनेही नाबाद 37 धावांच्या खेळीत 23 चेंडूत 5 चौकार व 1षटकार फटकावला. या सामन्याद्वारे पाटीदारने यंदाच्या स्पर्धेतच नव्हे तर स्पर्धेच्या इतिहासातील आपले पहिले शतक साजरे केले ते देखील स्पर्धेच्या अत्यंत महत्वाच्या सामन्यात. लखनौकडून मोहसिन खान, कृणाल पंड्या, आवेश खान व रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – रॉयल चॅलेंजर बेंगळुरु – 20 षटकांत 4 बाद 207 धावा. (विराट कोहली 25, रजत पाटीदार नाबाद 112, दीनेश कार्तिक नाबाद 37, मोहसिन खान 1-25, कृणाल पंड्या 1-39, आवेश खान 1-44, रवी बिष्णोई 1-45).





