घरच्या मैदानावर राजस्थानचा पराभव ! लखनौ सुपर जायंट्सचा 10 धावांनी विजय

जयपूर – आवेश खान व मार्कस स्टोनिस यांनी मोक्याच्या क्षणी घेतलेल्या बळींच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेतील बुधवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सवर 10 धावांनी विजय मिळवला. एकवेळ यशस्वी जयस्वाल व जोस बटलर यांच्या धडाकेबाज सुरुवातीनंतरही अन्य फलंदाजांनी साफ निराशा केल्यामुळे राजस्थानला घरच्याच मैदानावर पराभवाला सामोरे जावे लागले.
लखनौने विजयासाठी दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात धडाकेबाज झाली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल व जोस बटलर यांनी नेहमीच्याच स्टाइलने आक्रमक फलंदाजी केली. या जोडीने लखनौच्या अननुभवी गोलंदाजीवर वर्चस्व राखले.
बटलरपेक्षा जयस्वाल जास्त फटकेबाजी करत होता. या दोघांनी 87 धावांची सलामी दिली. जयस्वाल अर्धशतकाच्या जवळ आलेला असताना 44 धावांवर बाद झाला. त्याने 35 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार फटकावले. यानंतर कर्णधार संजू सॅमसन 2 धावांवर धावबाद झाला. बटलरला साथ देण्यासाठी देवदत्त पडिक्कल खेळपट्टीवर आला.
स्थिरावलेला बटलरचाही संयम सुटला व उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात 40 धावांवर स्टोनिसच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 41 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार खेचला. यावेळी राजास्थानचा डाव चांगल्या सुरुवातीनंतरही 3 बाद 97 असा संकटात सापडला होता. त्यावेळी राजस्थानला 39 चेंडूत 58 धावांची गरज होती.
यावेळी पडिक्कलने शेमरन हेटमायरच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले. 30 चेंडूत 51 धावांची गरज असताना हेटमायरनेही अनावश्यक फटका मारून आपली विकेट गमावली. पडिक्कलने रियान परागच्या साथीत विजयासाठी निकराचे प्रयत्न केले. त्यांना विजयासाठी 6 चेंडूत 19 धावा हव्या होत्या. परागने आवेश खानच्या पहिल्याच चेंडूवर चौकार फटकावला त्यानंतर लेगबायची एक धाव मिळाली व पडिक्कल फलंदाजीला आला. यानंतरच्याच चेंडूवर पडिक्कलला आवेशने बाद केले. पडिक्कल 21 चेंडूत 4 चौकारांसह 26 धावा करून परतला. त्यानंतरच्याच चेंडूवर ध्रुव जुरल बाद झाला. परागने नाबाद 15 तर रवीचंद्रन अश्विनने नाबाद 3 धावा केल्या. मात्र, ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.
तत्पूर्वी, कर्णधार लोकेश राहुल व केल मायर्स यांनी केलेल्या धडाकेबाज सुरुवातीनंतरही लखनौ सुपर जायंट्सचा डाव घसरला. मात्र, तळात निकोसल पूरन आणि मार्कस स्टोनिस यांनी थोडीफार चमक दाखवल्यामुळे त्यांना राजस्थान रॉयल्सविरुद्ध 20 षटकांत 7 बाद 154 अशी मजल मारता आली.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने लखनौ सुपर जायंट्सला पहिल्यांदा फलंदाजी दिली. लखनौचे सलामीवीर कर्णधार लोकेश राहुल व केल मायर्स यांनी संघाला 82 धावांची सलामी दिली. त्यातच राहुल 39 धावांवर परतला. आयुष बदोनी व दीपक हुडाने निराशा केली. दरम्यान, मायर्सने अर्धशतक पूर्ण केले. परंतु लगेचच तो 51 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 42 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 षटकार खेचले.
यावेळी निकोसल पूरन मार्कस स्टोनिस यांनी धावांचा वेग वाढवला. त्याचवेळी स्टोनिसला संदीप शर्माने 21 धावांवर बाद केले. त्यानंतर कृणाल पंड्याने पूरनच्या साथीत संघाचे दीडशतक पूर्ण केले. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर पूरन 28 धावांवर धावबाद झाला. त्याने 20 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावला. अखेरच्या चेंडूवर युधवीर सिंग चरकही धावबाद झाला.
आवेशने सामना जिंकून दिला
लखनौचा वेगवान गोलंदाज आवेश खानने या सामन्यात धोकादायक शेमरन हेटमायर व भरात असलेला देवदत्त पडिक्कल या दोघांना बाद केले. हे दोन फलंदाज या स्पर्धेत प्रत्येक संघासाठी डोकेदुखी ठरले आहेत. मात्र, या सामन्यात आवेशने त्यांचा अडसर दूर केल्याने लखनौचा विजय सोपा ठरला.
बोल्टची भेदक गोलंदाजी
राजस्थानचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट याने केल मायर्स फटकेबाजी करत असतानाही अत्यंत अचूक गोलंदाजी केली. त्याने चौकार व षटकारांना ब्रेक लावत मायर्स व राहुल या दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवले होते. त्याने आपल्या 4 षटकांत एक षटक निर्धाव टाकताना अवघ्या 16 चेंडूत 1 बळी घेतला.
लक्षवेधी
केल मायर्सचे
अफलातून अर्धशतक
कर्णधार राहुलची
उपयुक्त खेळी
तरीही लखनौची
फलंदाजी घसरली
राजस्थानच्या अश्विनने लावला धावांना ब्रेक
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपर जायंट्स – 20 षटकांत 7 बाद 154 धावा. (लेकेश राहुल 39, केल मायर्स 51, रवीचंद्रन अश्विन 2-23, ट्रेन्ट बोल्ट 1-16, संदीप शर्मा 1-32, जेसन होल्डर 1-37). राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 6 बाद 144 धावा. (यशस्वी जयस्वाल 44, जोस बटलर 40, देवदत्त पडिक्कल 26, रियान पराग नाबाद 15, रवीचंद्रन अश्विन नाबाद 3, आवेश खान 3-25, मार्कस स्टोनिस 2-28).





