केंद्रीय मंत्री शेखावत यांना राजस्थान पोलिसांची नोटीस

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते गजेंद्रसिंह शेखावत यांना सोमवारी राजस्थान पोलिसांनी नोटीस बजावली. त्या नोटिसीद्वारे शेखावत यांना आवाजाचे नमुने देण्यास आणि जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे.
राजस्थानमधील सत्तासंघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप त्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसकडून केला जात आहे.
अशातच एका ऑडिओ क्लिपवरून राजस्थानमधील राजकीय वातावरण तापले आहे. त्या क्लिपमध्ये शेखावत यांचा आवाज असून ते सरकार पाडण्याच्या हालचाली करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. त्या प्रकरणाचा तपास राजस्थान पोलिसांचा विशेष गट (एसओजी) करत आहे.
याआधीच क्लिपच्या आधारे गुन्हा नोंदवणाऱ्या एसओजीने आता शेखावत यांना नोटीस बजावली आहे. तर कॉंग्रेसने शेखावत यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, शेखावत यांच्या प्रतिक्रियेमुळे ते चौकशीला सामोरे जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
शेखावत यांनी ऑडिओ क्लिपच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एसओजीने प्रथम ती क्लिप कुठून मिळाली ते स्पष्ट करावे. ती क्लिप खरी आहे की नाही याची चौकशी व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे.





