Rajasthan Jal Jeevan Mission Scam: राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) आज मोठी कारवाई केली आहे. एसीबीने ९०० कोटींहून अधिक रुपयांच्या जल जीवन मिशन (जेजेएम) घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करत अशोक गेहलोत यांच्या पूर्वीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेश जोशी यांना अटक करण्यात आली. एसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) पहाटे जयपूर रेल्वे स्टेशनजवळील सन कॉलनीतील जोशी यांच्या निवासस्थानी छापा टाकला आणि चौकशीनंतर पहाटे ५:०० च्या सुमारास त्यांना अटक केली. एप्रिल २०२५ मध्ये, अंमलबारी संचालनालयाने (ईडी) याच प्रकरणात माजी कॅबिनेट मंत्री जोशी यांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. जोशी यांनी सात महिने तुरुंगात काढले, परंतु ३ डिसेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. प्रकरण काय आहे? (Rajasthan Jal Jeevan Mission Scam) हे प्रकरण प्रत्येक घराला नळाचे पाणी पुरवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत जारी केलेल्या निविदांमधील कथित अनियमिततेशी संबंधित आहे. जोशी आणि इतरांवर एका मर्जीतील कंपनीला निविदा मिळवून देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप आहे. Rajasthan Jal Jeevan Mission Scam: राजस्थानच्या माजी कॅबिनेट मंत्र्याला अटक ; ९०० कोटींच्या घोटाळ्यात झाली कारवाई श्री गणपती ट्यूबवेल आणि श्री श्याम ट्यूबवेल नावाच्या कंपन्यांनी आयआरसीओएन इंटरनॅशनलने कथितरित्या जारी केलेली बनावट अनुभव प्रमाणपत्रे सादर करून या निविदा मिळवल्या असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये श्री गणपती ट्यूबवेलने फसवणूक करून ८५९.२ कोटी रुपयांचे कंत्राट आणि श्याम ट्यूबवेलने १२०.२५ कोटी रुपयांची निविदा मिळवली आहे. २२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल (Rajasthan Jal Jeevan Mission Scam) माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध अग्रवाल यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे, तर एसीबीने २०२४ मध्ये आर्थिक सल्लागार, मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्यासह २२ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. आरोपींच्या यादीत जेजेएमचे आर्थिक सल्लागार सुनील शर्मा, तत्कालीन मुख्य अभियंता राम करण मीना, दिनेश गोयल, अतिरिक्त मुख्य अभियंता अरुण श्रीवास्तव, रमेश चंद मीना, परितोष गुप्ता, अधीक्षक अभियंता निरेल कुमार, विकास गुप्ता, महेंद्र प्रकाश सोनी, भगवान सहाय जाजू, जितेंद्र शर्मा आणि कार्यकारी अभियंता विशाल सक्सेना यांच्यासह इतरांचा समावेश आहे. सध्या, तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. एसीबीने त्यांच्या मालमत्तेची माहिती गोळा करून ती न्यायालयासमोर सादर केली आहे. आता त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाईल.