Rajan Salvi: अखेर राजन साळवींचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’; उपनेतेपदाचा राजीनामा, शिंदे सेनेत प्रवेशाची शक्यता

रत्नागिरी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते राजन साळवी हे पक्षाला रामराम करणार असल्याची माहिती समोर येत होती. अखेर आज राजन साळवी यांनी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ते उद्या, गुरुवारी दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्यार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. परंतु, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. त्यामुळे त्यांनी अंतर्गत राजकारणाला वैतागून पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे याचा मोठा फटका ठाकरेसेनेला बसणार आहे. विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे राजन साळवी नाराज होते. यावरून ठाकरे गटात अंतर्गत धुसफुस सुरू होती. परंतु, ठाकरेंची साथ सोडायची की नाही, याबाबत राजन साळवी द्विधा मनस्थितीत होते.
इतकेच काय तर मविआ सरकारची सत्ता गेल्यानंतर राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा लागला होता. तरीही राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेटाने उभे राहिले होते. पण आता तर थेट ठाकरेंनीच त्यांची कानउघडणी केल्याने राजन साळवी यांनी आणखी फार काळ पक्षात न थांबण्याचा निर्णय घेत शिंदेसेनेच्या वाटेवर चालण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तर एकनाथ शिंदे यांनीही पक्षात त्यांचे स्वागतच आहे, असे म्हटले असून यामुळे कोकणात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.





