“लालबागचा राजा देखील गुजरातला…”; अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरुन संजय राऊतांची टीका

Sanjay Raut Vs Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असणार आहे. यावेळी ते विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबद्दलही चर्चा करणार असल्याचे बोललं जात आहे. यादरम्यान अमित शाह लालबागच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
‘ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग त्यांनी पळवले, राज्यातील अनेक संस्था गुजरातला पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजा देखील गुजरातला पळवतील की काय, अशी शंका मला आहे,’ असा टोला संजय राऊत यांनी अमित शाह यांना लगावला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“महाराष्ट्र लुटण्यासाठी अमित शाहांचे दौरे सुरु आहेत. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे. महाराष्ट्राला कमजोर करायचे आहे. महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे. महाराष्ट्रातून ज्या पद्धतीने व्यापार, उद्योग, रोजगार अनेक महत्त्वाच्या आर्थिक केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शहा यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत, पण कमजोर गृहमंत्री आहेत”, असे संजय राऊत म्हणाले..
“एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. तर देशात जम्मू-काश्मीर, मणिपूर असेल किंवा देशातील इतर भाग असतील इकडे केंद्रीय गृहमंत्र्यांचे अजिबात लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी, लूटमार याला त्यांचा पाठिंबा आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी सारखे स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक कमजोर करणे हे एका गृहमंत्र्यांचे काम नाही. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुबळा करायचा त्यांच्या प्रयत्न आहे आणि त्यासाठीच ते वारंवार महाराष्ट्रात येत असतात. महाराष्ट्राची जनता त्यांना महाराष्ट्राचा शत्रू मानते,” असेही संजय राऊत म्हणाले.
लालबागचा राजा गुजरातला नेतील…
“लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत. येऊ द्या, पण मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग, अनेक संस्था त्यांनी गुजरातला पळवल्या त्याप्रमाणे ते एक दिवस लालबागचा राजा गुजरातला नेणार नाहीत ना, हे काहीही करू शकतात. लालबागचा राजा प्रसिद्ध आहे, देशभरातून लोक दर्शनासाठी येत असतात म्हणून अमित शाह उद्या लालबागचा राजाही गुजरातला नेण्याचा प्रस्ताव देतील,” असे संजय राऊत म्हणाले.
“लोकसभेचा निकाल ज्याप्रकारे महाराष्ट्राने दिले आहेत, त्यानुसार त्यांना विधानसभेत महाराष्ट्राला आणखी कमजोर करायचे आहे, त्यामुळे ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाहीत. जर हिंमत असेल तर विधानसभेच्या निवडणुका हरियाणासोबत घ्या, मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही घ्या. मुंबई, पुणे, नागपूर यांची लूट करणे हाच तुम्हाचा सर्वाधिक मोठा धंदा आहे,” असे संजय राऊत म्हणाले.





