“राजा बाबू अजूनही लोकसभेचा पराभव स्वीकारू शकले नाहीत”; कंगना राणावत यांची विक्रमादित्य सिंह यांच्यावर टीका

Kangana Ranaut | Vikramaditya Singh – भारतीय जनता पार्टीच्या खासदार कंगना राणावत यांनी हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव त्यांना अजूनही स्वीकारता आलेला नाही असे कंगना यांनी विक्रमादित्य सिंह यांच्यासंदर्भात बोलताना म्हटले आहे.
मंडीच्या खासदार राणावत यांनी विक्रमादित्य सिंह आणि त्यांची आई आणि हिमाचाल प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रतिभा सिंह यांच्यावर हल्ला चढवला. राजकारणात स्पर्धा असते पण मर्यादा ओलांडता कामा नये. एखाद्याने वारंवार दुसऱ्यांवर चिखलफेक करू नये आणि अपशब्द वापरू नयेत अशी टिप्पणीही कंगना यांनी केली.
विक्रमादित्य सिंह राजा बाबू असल्याने लोकसभा निवडणुकीतील त्यांचा पराभव स्वीकारू शकले नाहीत असे त्या म्हणाल्या. सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह हे पूर्वीच्या रामपूर राजघराण्यातील सदस्य आहेत.
कंगना म्हणाल्या की, मंडीच्या माजी खासदार प्रतिभा सिंह आणि त्यांच्या कुटुंबाने गेल्या ४० वर्षांपासून या भागात राज्य केले परंतु खासदार निधीचा एक रुपयाही ते परिसरात खर्च करू शकले नाहीत.
त्यांनी प्रतिभा सिंह यांच्यावर लोकसभेत या प्रदेशातील लोकांचे प्रतिनिधित्व करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. मंडीच्या विकासासाठीचे त्यांचे दृष्टिकोन आणि आव्हाने सांगताना, कंगना म्हणाल्या की, रेल्वे, वीज आणि दळणवळण यासारख्या मूलभूत मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे.
मंडीचे भौगोलिक क्षेत्र विशाल आणि वैविध्यपूर्ण आहे आणि विकासाची मोठी क्षमता आहे, परंतु मंडीला नैसर्गिक आपत्तींसारख्या आव्हानांचाही सामना करावा लागतो. भरमौर आणि पांगी सारख्या दुर्गम भागात वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा अजूनही पुरेशा नाहीत.
या भागांसाठी बोगदे आणि सर्व हवामान रस्ते बांधण्याची मागणी दीर्घकाळापासून होती आणि हे मुद्दे संसदेत उपस्थित केले जात आहेत, असे कंगना राणावत यांनी सांगितले.





