Raj Thackeray : लोढा-बिढांनी मध्ये येऊ नये, कबुतरखान्यावरुन राज ठाकरेंनी लोढांसह जैन मुनींना खडसावलं

मुंबई : मुंबईतील कबुतरखाना प्रकरणाने राजकीय वादाला तोंड फोडले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने दादर येथील ऐतिहासिक कबुतरखाना बंद केला असून, कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयाविरोधात जैन समाजाने तीव्र आंदोलन केले आहे. Raj Thackeray On Kabutar Khana
या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रथमच आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यांनी जैन समाज, जैन मुनी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना चांगलंच खडसावलं आहे.
राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका
राज ठाकरे म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वांनी वागले पाहिजे. जैन मुनींनीही हे समजून घ्यावे. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात, हे लक्षात घ्यायला हवे. कोर्टाने कबुतरांना खाद्य देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे जो कोणी हा आदेश मोडेल, त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी,” असे राज ठाकरे यांनी ठणकावले. Raj Thackeray
त्यांनी दादर कबुतरखानाजवळ जैन समाजाच्या आंदोलनावरही नाराजी व्यक्त केली. “जेव्हा जैन समाजाने आंदोलन केले, तेव्हा त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती, असंही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
लोढा-बिढा यांनी मध्ये येऊ नये
मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबुतरखाना बंदीच्या विरोधात पर्यायी जागा शोधण्याचे सुचवले होते. यावर राज ठाकरे यांनी लोढा यांना खडसावत म्हटले, लोढा-बिढा यांच्यासारखे लोक मध्ये येऊ नयेत. मंगलप्रभात लोढा हे कोणत्या एका समाजाचे मंत्री नाहीत, ते संपूर्ण राज्याचे मंत्री आहेत. त्यांनीही उच्च न्यायालयाचा आदेश मानला पाहिजे. ठाकरे यांनी लोढा यांच्या भूमिकेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. Raj Thackeray On Kabutar Khana
कबुतरखाना वाद काय आहे?
मुंबईतील 51 कबुतरखान्यांपैकी दादरचा कबुतरखाना हा 1933 मध्ये स्थापन झालेला ग्रेड-II वारसा स्थळ आहे. जैन समाजात कबुतरांना खाद्य देण्याला ‘जीवदया’चे धार्मिक महत्त्व आहे. मात्र, कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार, जसे की ‘पिजन लंग’ (Pigeon Lung), होण्याचा धोका असल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. यामुळे 3 जुलै 2025 रोजी विधान परिषदेत शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले.
30 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य देणे ‘सार्वजनिक उपद्रव’ ठरवत, सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आणि उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. 2 ऑगस्ट रोजी बीएमसीने दादर कबुतरखान्यावर ताडपत्री आणि बांबू लावून बंद केले. यामुळे जैन समाजाने तीव्र आंदोलन केले, आणि 6 ऑगस्ट रोजी शेकडो जैन बांधवांनी ताडपत्री फाडून कबुतरांना खाद्य टाकले. Jain Muni On Raj Thackeray





