Raj Thackeray : राज ठाकरेंचा BMC निवडणुकीसाठी मास्टरप्लॅन; 8 नवे शिलेदार नियुक्त

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी नव्या विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये प्रदीप वाघमारे (कुर्ला), रवींद्र शेलार (अणुशक्ती नगर), महेश फारकसे (कांदिवली पूर्व), दीपक आर्य (जोगेश्वरी), पांडुरंग राणे (दहिसर), विश्वास मोरे (बोरिवली), अनिल पंडित राजभोज (भांडुप), आणि दिनेश पुंडे (मलबार हिल) यांचा समावेश आहे.
या नियुक्त्यांमुळे मनसेने पश्चिम उपनगरातील मराठी मतदारांसह गुजराती आणि उत्तर भारतीय समाजावरही लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. मात्र, रविवारी (२७ जुलै) रंगशारदा सभागृहात होणारा मनसेचा बहुचर्चित मेळावा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
BMC निवडणुकीच्या तयारीसाठी मनसेने वॉर्डनिहाय प्रचारावर विशेष लक्ष दिले आहे. नव्या विभागप्रमुखांना पक्षाच्या केंद्रीय समितीने ‘काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हटवून नवे पर्याय सुचवा’ या राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार निवडले आहे. केंद्रीय समितीने मुंबईतील पक्षाची परिस्थिती, कार्यकर्त्यांचे योगदान आणि स्थानिक पातळीवरील आव्हानांचा आढावा घेऊन हा अहवाल तयार केला.
यामुळे जुन्या नियुक्त्या रद्द करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. खासकरून, पश्चिम उपनगरातील कांदिवली, जोगेश्वरी, दहिसर आणि बोरिवली यासारख्या मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांसह इतर समाजांचेही प्राबल्य आहे, जिथे मनसे आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, मनसेचा रविवारी रंगशारदा सभागृहात होणारा मेळावा पक्षातील अंतर्गत बदल प्रक्रियेमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, महिला-पुरुष विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखा अध्यक्ष आणि अंगिकृत संघटनांचे प्रमुख सहभागी होणार होते.
पक्षाने मेळावा रद्द करण्याचे कारण स्पष्टपणे जाहीर केलेले नाही, परंतु पक्षातील पुनर्रचना आणि रणनीतीतील बदल यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पुढील मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे मनसेकडून सांगण्यात आले आहे.





