सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Raj Thackeray Post on Savitribai Phule’s birth anniversary : आज महाराष्ट्रासह देशभरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पहिल्या महिला शिक्षिका असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज 194वी जयंती आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना अभिवादन करणारी पोस्ट सोशल सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोबतच, या पोस्टमध्ये त्यांनी सरकारकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून रुपांतर करण्यात येणाऱ्या भिडे वाड्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. लाडक्या बहिणींप्रमाणेच स्मारकाच्याबाबतीतही धरसोडपणा करू नये, असा टोला देखील लगावला.
राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांच्यामुळे रोवली गेली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्यशोधनाच्या खडतर प्रवासात ज्यांनी मोलाची साथ दिली, त्या सावित्रीबाई फुलेंची आज जयंती. स्त्री स्वातंत्र्य औषधाला देखील सापडणार नाही अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. तो काळ असा होता की स्त्री शिकली तर तिच्या सात पिढ्या नरकात जातील असं मानण्याचा काळ. पण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघेही ज्ञानासाठी आसुसलेले होते, आणि त्यामुळेच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि इतकंच नाही तर मुलींसाठी शाळा सुरु केली. त्यावेळच्या अखंड हिंदुस्थानातील, स्वदेशीय व्यक्तीने काढलेली पहिलीच मुलींची शाळा. पण सावित्रीबाईंना प्रचंड अहवेलना, आणि उपहास सहन करावा लागला. आज थेट अंतराळात झेप घेणारी स्त्री असो की एखाद्या उद्योगसमूहाची प्रमुखपदी बसलेली स्त्री असो, तिचा हा प्रवास सावित्रीबाईंमुळेच शक्य झाला हे नक्की. सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.
2 वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने पुण्यात ज्या भिडे वाड्यात सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या वाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याची घोषणा केली होती. या घोषणेचं तेंव्हा आम्ही स्वागत केलं होतं आणि हे स्मारक लवकरात लवकर व्हावं, अशी मागणी त्यांनी केली.
भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांच्यामुळे रोवली गेली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्यशोधनाच्या खडतर प्रवासात ज्यांनी मोलाची साथ दिली, त्या सावित्रीबाई फुलेंची आज जयंती. स्त्री स्वातंत्र्य औषधाला देखील सापडणार नाही अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. तो काळ असा होता की… pic.twitter.com/bohN9LXLsp
— Raj Thackeray (@RajThackeray) January 3, 2025
मध्यंतरी या स्मारकाचं कामकाज कुठवर आलं आहे हे जाणून घेतलं, तेंव्हा कळलं की मध्यंतरी हे काम अनेक कायदेशीर गुंतागुंतीत अडकलं होतं, त्यातले काही विषय न्यायप्रविष्ट होते, जे आता सुटलेत. मुळात इतक्या मोठ्या महापुरुषांच्या स्मारकांसाठी देखील आपल्याला कायदेशीर लढाया लढाव्या लागतात हेच दुर्दैव. असो.. पण आता हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच अपेक्षा. आणि स्मारक म्हणजे एखादा पुतळा किंवा एखादं संग्रहालय इतकं मर्यादित न ठेवता, त्याला आधुनिकतेची जोड द्यावी. यासाठी सरकारी साचा सोडला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आढावा घेणारा एखादा बहुभाषिक साउंड आणि लाईट शो, एखादी डिजिटल लायब्ररी असं काहीतरी असावं. आणि हे सगळं एका कालमर्यादेत पूर्ण करावं. अन्यथा इतर अनेक स्मारकं जशी लालफितीत अडकतात तसं हे स्मारक अडकू नये इतकीच इच्छा.
सरकारनेच कालच लाडक्या बहीण नक्की कोणाला म्हणावं याचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केला आहे, थोडक्यात निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार असं दिसतंय. असो, असं धरसोडपण स्मारकाच्या बाबतीत दिसू नये, असे म्हणत राज ठाकरे यांनी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीवरून सरकारला टोला देखील लगावला आहे.





