नाशिक : महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा तापली असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सावध पवित्रा घेत सस्पेन्स वाढवला आहे. नाशिक येथील मनसेच्या तीनदिवसीय शिबिरादरम्यान अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईतील मराठीच्या विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नसून, तो केवळ मराठी भाषेच्या मुद्द्यावर केंद्रित होता. युतीबाबतचा निर्णय नोव्हेंबर-डिसेंबरनंतर स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात महायुती सरकारने प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्तीचा प्रस्ताव मांडल्यानंतर राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत तीव्र विरोध केला होता. सरकारने हा प्रस्ताव मागे घेतल्यानंतर ५ जुलै २०२५ रोजी मुंबईत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला. तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले, ज्यामुळे मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना उधाण आले. उद्धव ठाकरे यांनी “आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्र राहू,” असे वक्तव्य करत युतीचे संकेत दिले होते. मात्र, राज ठाकरे यांनी युतीबाबत सावध भूमिका घेतली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मराठीच्या विजयी मेळाव्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. तो फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता. नोव्हेंबर-डिसेंबरनंतर युतीबाबत चित्र स्पष्ट होईल, मग निर्णय घेऊ.” त्यांनी पुढे सांगितले की, मागील सरकारने हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला होता, परंतु त्याची अंमलबजावणी केली नव्हती, तर सध्याच्या सरकारने जीआर काढला होता, ज्याला मराठी जनतेच्या रोषामुळे मागे घ्यावे लागले. युतीबाबत संभ्रम कायम – उद्धव ठाकरे यांनीही युतीसंदर्भात “प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होऊ द्या, मग बघू,” अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, सूत्रांनुसार, महायुतीकडून या युतीला खीळ घालण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. राज ठाकरे यांनी यापूर्वी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता, परंतु विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वतंत्रपणे लढत कोणतीही जागा जिंकली नाही. मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी – मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकत्र येत मराठी जनतेत उत्साह निर्माण केला आहे. मात्र, युतीच्या चर्चेला राज ठाकरेंच्या सावध वक्तव्याने नवे वळण मिळाले आहे. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही युती प्रत्यक्षात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.