Raj Thackeray: नुसत्या शपथा कसल्या घेताय? राज ठाकरेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल, काय म्हणाले पाहा….

Raj Thackeray । Sharad Pawar । Badalapur: बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले. पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई अशा प्रमुख शहरांत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून हे आंदोलन केले करण्यात येत आहे. पुण्यात खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना एक शपथ घ्यायला लावली.
या आंदोलनावेळी शरद पवारांनी तोंडावर काळ्या रंगाचा मास्क आणि दंडावर काळी पट्टी बांधत सहभाग नोंदवला. या आंदोलनानंतर शरद पवारांनी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना एक शपथ घ्यायला लावली.
“मी अशी शपथ घेतो की, मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझे गाव, माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांवर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवेन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही.
महिलांचा सन्मान राखेन आणि या पुण्य नगरीतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेन”, अशी शपथ शरद पवारांनी यावेळी वाचून दाखवली. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही ही प्रतिज्ञा घेतली.
दरम्यान, यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “तुमच्या हातात सरकार येतं, तेव्हा तुम्ही या गोष्टी करा. नुसत्या शपथा कसल्या घेताय?” अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांवर हल्लाबोल चढवला. पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी शरद पवार यांचावर टीका केली आहे.





