Raj Thackeray : छळणाऱ्या सासूची उपमा देत राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला काही तास शिल्लक राहिले आहेत. यामुळे प्रत्येक पक्षाकडून आक्रमक प्रचार केला जात आहे. यादरम्यान छळणाऱ्या सासूची उपमा देत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. मनसेचे शिवडीचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत त्यांनी ही टीका केली.
काय म्हणाले राज ठाकरे?
एक कुटुंब असतं, तीन मुलं असतात. पहिल्याचं लग्न होतं, सुनबाई घरी येते, सासुबाईंशी भांडणं सुरू होतं. तो मुलगा म्हणतो, आपण दुसरीकडे घर करू आणि तिकडे राहायला जाऊ. मुलगा आणि त्याची बायको दुसरीकडे राहायला जातात. लोक म्हणतात, काय हल्लीच्या मुली घरात आल्या की सासुबाईंशी नीट बोलायला नको, घरचं नीट करायला नको… दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, सुनबाई घरात येते, सासुबाईंशी वाद सुरू होतात.
दुसरा मुलगाही दुसरीकडे राहायला जातो. तिसरी सून येते. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली, आताही भांडणं… मग लोक म्हणतात, सासुमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. कळलं का…. शिवसेनेची सासू आतमध्ये बसलीये ना, तिचा प्रोब्लेम आहे. मुलं सोडून गेलीये त्यांचा प्रॉब्लेम नाहीये. हा सासुचा प्रॉब्लेम आहे. ज्या लोकांनी तुमच्या मतांचा अवमान केलाय, यांना अद्दल घडवली पाहिजे, असे राज म्हणाले.
शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.




