मुंबई : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण तापले आहे. येत्या १५ जानेवारी रोजी राज्यातील एकूण २९ महापालिकांसाठी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांत भाजप तसेच महायुतीचे घटक पक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी दणदणीत यश मिळवले आहे. या यशाच्या जोरावर महापालिका निवडणुकांतही विजयी पताका फडकावण्यासाठी भाजप अन्य पक्षातील दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात सामावून घेत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मीरा-भाईंदरमध्ये मोठा धक्का बसला आहे. मनसेचे मीरा-भाईंदर विभाग अध्यक्ष श्रीजीत मोहन यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे सुमारे ७० कार्यकर्तेही भाजपाच्या झेंड्याखाली आले आहेत. हा प्रवेश सोहळा स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रवेशामुळे मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचे गणित बदलले असून, भाजपाला स्थानिक पातळीवर चांगलीच ताकद मिळाली आहे. मनसेची संघटना कमकुवत होण्याची शक्यता श्रीजीत मोहन हे मीरा-भाईंदर भागात मनसेचे प्रमुख चेहरे मानले जातात. त्यांना त्या भागात बऱ्यापैकी जनाधार आहे. त्यांच्यासह ७० कार्यकर्त्यांच्या भाजपात प्रवेशाने मनसेची स्थानिक संघटना कमकुवत झाली आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षांतराचा धक्का मनसेला बसला असल्याने पक्षाला मीरा-भाईंदरमध्ये संघटना नव्याने बांधण्याची नामुष्की ओढवली आहे. मोहन यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मनसेला त्यांच्याच तोडीचा नेता विभाग अध्यक्षपदी नेमावा लागेल. या पक्षांतरामुळे मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत मनसेची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजपाला या प्रवेशामुळे स्थानिक स्तरावर मजबुती मिळाली असून, महायुतीच्या विजयाच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालाकडे आता उत्सुकतेने लक्ष लागले आहे.