राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा? संजय राऊतांनी नेमकं काय सांगितले?

Sanjay Raut | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धराला आहे. दोन्ही पक्षातील नेते सकारात्मक असून कार्यकर्त्यांचेही स्थानिक पातळीवर मनोमिलन सुरू झालं आहे. मात्र ठाकरे ब्रँड नेमका एकत्र कधी येणार? याबाबत विचारणा अनेकांकडून केली जात आहे. यादरम्यान आज पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेले एक विधान चर्चेत आले आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक आहेत. त्याचाच परिणाम जमिनीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले असेल. त्यात चिंता करण्यासारखे काय आहे, उलट या गोष्टीचे स्वागत केले पाहिजे.”
“अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मुलांच्या जन्माच्या आधीपसून हे भाऊ आहेत ना. मी दोघांनाही पाहिले आहे. १० मिनिटांनी मी आता राज ठाकरेंना फोन करणार आहे किंवा १० मिनिटांनी मी आता उद्धव ठाकरेंना फोन करतो, असा सोशल मीडियावर मेसेज टाकून दोन्ही बंधू एकमेकांना फोन करणार नाही. काय सांगावे, फोन झालेही असतील, तुम्हाला फळ दिसल्याशी कारण आहे. युतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते,” असेही सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे.
“आमच्यासाठी ते दुसरे घर”
संजय राऊत स्वतः शिवतीर्थ कॅफेटेरियावर प्रस्ताव घेऊन का येत नाही, अशा आशयाची विचारणा अमित ठाकरेंनी केल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावर “जसे आदित्य ठाकरे आहेत, तसेच अमित ठाकरे आहेत. त्यांची विधानेही गोड आहेत. अमित ठाकरे यांच्या मनात जी भावना आहे, त्याचे काका म्हणून मी स्वागत करतो. अमित ठाकरे यांची अलीकडील विधाने चांगली आहेत. आदित्य ठाकरेंची भूमिकाही चांगली आहे. अजून मनोमिलन काय हवे आहे. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाही, ते दुसरे घर आहे,” असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबतची चर्चा आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधु एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Sanjay Raut |
हेही वाचा:
पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात उंच पुलाचे केले उद्घाटन ; पुलावर हातात तिरंगा घेऊन चालले





