पुणे | मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जागृती वाढवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी चांगल्या प्रकारे जागृती करावी. विशेषत: शहरी मतदार संघात मतदान टक्केवारीत मोठी वाढ होण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृतीवर भर द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त महेश पाटील,
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात सर्व मतदार संघात मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर विविध माध्यमांतून जनजागृती केल्यामुळे मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभला असून जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 86 लाख 47 हजारावर पोहोचली झाली आहे. पुणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेला जिल्हा ठरला आहे.
नामनिर्देशन दाखल करण्यास सुरूवात झाल्यानंतर 10 दिवसांपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. त्याची माहिती गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सभासदांना द्यावी आणि ते अर्ज क्र. 6 भरतील यादृष्टीने प्रयत्न करावेत. कोणीही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.
मतदारांना आपल्या मतदान केंद्रांची माहिती व्हावी यासाठी “नो युवर पोलिंग स्टेशन’ हा उपक्रम लोकसभा निवडणुकीवेळी राबविला होता. या उपक्रमाची यावेळी प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर, गृह निर्माण संस्था स्तरावर तसेच अन्य ठिकाणी जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी.
गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सदस्यांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी मदत करावी, त्यांचे मतदान केंद्राची माहिती त्यांना द्यावी. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, शहरातील सहकारी संस्थांचे सर्व उपनिबंधक तसेच त्यांच्याअंतर्गत अधिकारी, कर्मचारी, पॅनेलवरील लेखापरीक्षक यांनी याकामी गृहनिर्माण संस्थांसोबत समन्वयाने काम करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
वृद्धाश्रमातही मतदान केंद्र
लोकसभा निवडणुकीवेळी 80 वर्षावरील ज्येष्ठ मतदारांसाठी राबविलेल्या “आजी आजोबा चला मतदानाला…!’ या नावीन्यपूर्ण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
ही मोहीम अधिक चांगल्या प्रकारे राबवायची असून, गृहनिर्माण संस्थांनी आपल्या संस्थातील वृद्ध मतदारांची माहिती दिल्यास त्याप्रमाणे व्हीलचेअरची व्यवस्था करता येईल. यावेळी वृद्धाश्रमातही मतदान केंद्र स्थापन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.





