मराठवाड्यात पावसाची दडी; पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. गेल्या महिनाभरापासून मराठवाड्यात पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. यातून आता खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागच्या चार दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस झाला. परंतु मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत बहुतांशी ठिकाणी पाऊसच गायब असल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादनाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाअभावी मराठवाड्यातील बहुतांश भागांत कोवळी पिके सुकत आहेत. लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. हिंगोली जिल्ह्यात पंच्याऐंशी टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी पावसाच्या कमतरतेमुळे पिकांची वाढ खुंटली आहे.
मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यासोबतच बीड, लातूरममध्येही तुरळक ठिकाणी साधारण पाऊस झाला.
परभणी, नांदेड, हिंगोलीमध्येही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परंतु या पावसाने पिकाला आधार मिळालेला नाही. त्यामुळे हलक्या, सर्वसाधारण शेत जमिनीवरील पिके हातातून जाण्याच्या अवस्थेत आहेत.





